दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 30, 2026
- 115
शरद पवारांच्या खेळीकडे राज्याचे लक्ष
मुंबई ः अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये वाढलेली जवळीक आणि निवडणुकीच्या दरम्यान अनेकठिकाणी झालेली युती यावरुन गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याची चर्चा रंगली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीची दोन शकले झाली असली तरी दोन्ही पवारांना मानणारे दोन्हीकडेही नेते आहेत. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर जोरदार चर्चा रंगली असली तरी पवार भाजपसोबत जाण्यास अनुकूल नसल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
अजित पवार यांनी राज्यातील महापालिका व विधानसभा निवडणुकीत आक्रमकपणे भाजपविरोधात भुमिका घेतली होती. आपल्या भाषणात त्यांनी आपण फुले, शाहु व आंबेडकर यांची विचारसरणी त्यागली नसल्याची जाणिव महाराष्ट्रातील जनतेला करुन दिली होती. त्यामुळे अजित दादा सत्तेतून बाहेर पडून निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील अशी अटकळ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होती. महापालिका निवडणुकीमध्येही दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित येऊन अनेक ठिकाणी निवडणूक सुद्धा लढली होती. त्यामुळे आता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी केवळ औपचारिकता बाकी आहे अशीच चर्चा रंगली होती. मात्र, आता अजित पवार यांच्या धक्कादायक निधनाने या सर्वांवर पाणी फेरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ अजित पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासह खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे हे सुद्धा चर्चेमध्ये असल्याचे बोलले जाते.
अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची अटकळे जरी राजकीय वर्तुळात बांधली जात असली तरी पवार यांच्या राजकीय भुमिकेमुळे आता ते शक्य नसल्याचे बोलले जाते. शरद पवार यांनी नेहमीच शाहू, फुले व आंबेडकर यांची विचारधारा स्विकारुन आजपर्यंत राजकारण केले आहे. सुरुवातीपासून त्यांनी भाजपपासून दूर राहण्याची भुमिका स्विकारल्याने ते भाजपसोबत सत्तेत सहभागी होतील का? हा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. राज्यात अजून चार वर्षे भाजपचे सरकार राहणार असल्याने राष्ट्रवादीतील नेत्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शरद पवार यांची भुमिका स्विकारणे परवडणारे नाही. अजितदादांसारखे कणखर नेतृत्व आता राष्ट्रवादीत नसल्याने त्यांच्या पक्षातील नेते सत्तेतून बाहेर पडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणणे याला विरोध करतील.
- राख थंड होत नाही तोच...
1. नेत्यांनी रंग दाखवण्यास सुरुवात केली असून भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे असा सूर लावला असून प्रफ्फुल पटेल व सुनील तटकरे हे दादांची राख थंड होत नाही तोच वर्षावर जोडे झिजवायला लागले आहेत. या क्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या भाजपला ही आयती संधी चालुन आली असून भाजप कोणती भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
2. एप्रिल रोजी शरद पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत असून त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जोपर्यंत शरद पवार सक्रिय राजकारणात आहेत तोपर्यंत तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणे शक्य नसल्याचे राजकीय समिक्षकांचे मत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai