नगरसेविकेचे दागिने लुटले

नवी मुंबई ः पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेविका आणि महिला बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे यांच्या अंगावरील सोनेह काल रात्री 9 वाजता कामोठे येथून चोरट्यांनी लुटले. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण असा चार तोळ्याचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे. या बाबतची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कुसूम म्हात्रे या आपल्या महिला कार्यकर्त्यांसोबत मुंबईतील पक्षाचा कार्यक्रम आटोपुन परतत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत 5 ते 7 महिला कार्यकर्त्या देखील होत्या. कामोठे हायवेवरून म्हात्रे आणि त्याच्या सोबतच्या महिला या चालत आपल्या घरी परतत होत्या. याच वेळी काही अज्ञात चोरट्यांनी त्याच्या जवळ येऊन गळ्यातील सोन्याचे ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी वेळी म्हात्रे यांनी आरडाओरड केली. मात्र चोरटा सोन्याचे गंठण आणि चैन घेऊन घटना स्थळावरून फरार झाला. जवळपास 8 ते 10 तोळे सोने चोरट्याने लंपास केल्याचे सांगितले जात आहे. 

घटना घडल्यानंतर म्हात्रे यांनी थेट, कामोठे पोलीस स्टेशन गाठले. घडलेला सर्व प्रकार, पोलिसांना सांगितला. मात्र पोलीसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करुन तुम्ही तक्रार द्यायला उद्या सकाळी 11 वाजता या असा सल्ला देऊन घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. घटना रविवारी 8 ते 9 च्या दरम्यान घडल्या नंतर देखील पोलिसांनी या घटनेचे नोंद सोमवारी सकाळी 11 च्या नंतर का घेतली असा प्रश्न नगरसेविके उपस्थित केला आहे. पोलिसांच्या या भूमिकेविरोधात सामान्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. नगरसेविकेला लुटल्याची तक्रार घेत नसतील तर सर्वसामान्यांची काय अवस्था असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कामोठे वसाहतीमधील भर रस्त्यात लुटण्याचा घटनेमुळे वसाहती मधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.