कचरावेचक महिलांची प्रेरणादायी जिद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 20, 2026
- 37
दहावीच्या परिक्षेला 12 जणींची
नवी मुंबई : स्त्रीमुक्ती संघटना आणि प्रभात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, ज्यांचे दहावीचे शिक्षण अर्धवट राहिले होते अशा कचरावेचक महिलांसाठी ‘आता थांबायचं नाय’ या विशेष अभ्यासवर्गाची सुरुवात प्रा. वृषाली मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वर्षानुवर्षे शिक्षणापासून दूर राहिलेल्या या महिलांपैकी 12 जणी दहावीच्या परीक्षेला समोऱ्या जात आहेत. ही केवळ परीक्षा नाही, तर शिकण्याच्या जिद्दीने परिस्थितीला दिलेल हे उत्तर आहे.
प्रा. वृषाली मगदूम यांच्या स्त्री मुक्ती संघटनेने नवी मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांतील महिलांचे संघटन उभारून स्लम मॉडेल सुरू केले आहे. या स्लम मॉडेलमधील शेकडो महिला आज घरोघरी जाऊन ओला-सुका कचरा संकलन करत आहेत. मात्र हा उपक्रम फक्त स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता महिलांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या विकासाकडे वळला आहे. यातील महिलांना परिस्थितीमुळे शिकता आले नाही. प्रा.वृषाली मगदूम यांच्या पुढाकाराने दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू झाली. सुरुवातीला 25 महिला पुढे आल्या, अखेर 12 जणींनी सर्व अडचणींवर मात करत परीक्षा देण्याचा निर्धार केला.
या उपक्रमाला प्रशांत गाडेकर, सचिन आमडोस्कर, अजित खताळ, मधुकर वारभुवन, पल्लवी घारगे, निशा राठोड, आशा पाटील, अशोक गालवे आणि तुकाराम लोंढे या शिक्षकांची मोलाची साथ लाभली. प्रा. अजित मगदूम सर यांचे मार्गदर्शन आणि आशाताई गायकवाड यांचा समन्वय यामुळे हा उपक्रम अधिक सक्षम झाला. शिकवण्याबरोबरच परीक्षेसाठी आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या. शाळा सोडल्याचा दाखला मिळविण्यापासून गॅप सर्टिफिकेट तयार करण्यापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. पण जिद्द मात्र ढळली नाही. त्यांचा हा निर्णयच यशाची पहिली पायरी आहे.
विशेष म्हणजे यातील अक्षदा गायकवाड यांची मुलगी सृष्टी गायकवाड हीसुद्धा याच वर्षी दहावीची परीक्षा देत आहे. आई आणि मुलगी एकाच वेळी दहावीची परीक्षा देत आहेत, ही खऱ्या अर्थाने प्रेरणादायी घटना आहे. दहावीची परीक्षा ही केवळ शैक्षणिक टप्पा नाही; ती त्यांच्या जिद्दीची, मेहनतीची आणि स्वप्नांवरील विश्वासाची साक्ष आहे. प्रत्येक अभ्यासाची रात्र आणि प्रत्येक संघर्ष उद्याच्या यशस्वी आयुष्याचा मजबूत पाया घालत आहे.
या जिद्दी महिला फक्त दहावीची परीक्षा देत नाहीत, त्या समाजाला धडा देत आहेत. कचऱ्यातून कागद वेचणाऱ्या हातांनी आज वही उचलली आहे, हीच खरी क्रांती आहे. दहावी पास झाल्यावर त्यांचा आत्मविश्वास, त्यांची ओळख आणि समाजातील स्थान सगळेच बदलेल. त्यांचा संघर्ष समाजाला व विशेषतः महिलांना प्रेरणादायी ठरेल. -प्रा. वृषाली मगदूम, विश्वस्त, स्त्री मुक्ती संघटना
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai