नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण आरंभ
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 24
सर्व नमुंमपा रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात लस मोफत उपलब्ध
नवी मुंबई ः केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, राष्ट्रीय पातळीवर 28 फेब्रुवारी 2026 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला असून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते गुरुवारी सीबीडी बेलापूर येथील नागरी आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
महापौर यांच्या उपस्थितीत अनुष्का सोमनाथ कोळी व अक्षता सचिन कातकरी या विदयाप्रसारक हायस्कुल बेलापूर येथे इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या तसेच कु.अनुजा शंभु माळेकर या नमुंमपा शाळा क्र.4 सीबीडी बेलापूर येथे इयत्ता 8 वीत शिकणाऱ्या विदयार्थीनींना एचपीव्ही लस देण्यात आली. यावेळी त्यांना प्रोत्साहनपर कंपासपेटी भेट म्हणून देण्यात आली. याप्रसंगी बोलताना महापौर सुजाता पाटील यांनी सध्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता व त्यातही स्त्रियांना होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाची मोठी संख्या विचारात घेता सदर लस प्रतिबंधात्मक म्हणून घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. त्यादृष्टीने पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरातील मुलींचे यापासून संरक्षण व्हावे याकरिता ही लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून त्याचा लाभ प्रत्येक मुलीला मिळावा याकरिता पालकांनी जागरुक रहावे व आपल्या मुलीचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापौर महोदयांनी केले. सदर लसीकरण मोहीमेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शाळांच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात यावेत तसेच महानगरपालिकेची रुग्णालये व आरोग्य केंद्रे व वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे येथेही बॅनर्स लावून व्यापक प्रचार करावा असे महापौरांनी सूचित केले.
या मोहिमेत 14 वर्षे वयोगटातील (ज्या मुलींनी 14 वर्षे पूर्ण केलेली आहेत व 15 वर्षे पूर्ण केलेली नाहीत) मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्यात येईल. मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील 90 दिवसांच्या कालावधीत 15 वर्षे पूर्ण होणाऱ्या मुली देखील या तीन महिन्यांच्या एचपीव्ही (एचपीव्ही) लसीकरण मोहीमेत लसीकरणास पात्र असतील. नवी मुंबई महानगरपालिकेने आपली 5 रुग्णालये व 26 नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एचपीव्ही लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे. तरी नवी मुंबईतील पालकांनी गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी या मोहीमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या 14 वर्षे पूर्ण केलेल्या व 15 वर्षे पूर्ण न केलेल्या वयोगटातील प्रत्येक मुलीला एचपीव्ही लस देऊन गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai