महापौर निवासातील 48 लाखांच्या खर्चाने करदात्यांना हुडहुडी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 36
नवी मुंबई : बेलापूर येथील महापौर निवासात नवीन वातानु- कूलित (व्हीआरएफ/व्हीआरव्ही) यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या कामासाठी एकूण 48 लाख 48 हजार 82 रुपये इतका खर्च अपेक्षित असून, जुनी यंत्रणा अकार्यक्षम झाल्याने बदल आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र महापौर या ठिकाणी वास्तव्यास नसताना तेथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महापौर निवासातील विद्यमान वातानुकूलित व्यवस्था 20 वर्षापुर्वींची आहे. अनेकवर्ष झाल्याने तिची कार्यक्षमता घटली आहे. या पार्श्वभूमीवर ऊर्जा कार्यक्षम व अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित नवीन वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असून, नवीन यंत्रणेमुळे महापौर निवासातील सुविधा अधिक कार्यक्षम होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, गेली अनेक वर्ष महापौर निवासात कोणत्याही महापौरांनी वास्तव केले नसताना एवढा खर्च कोणासाठी असा सवाल विरोधकांकडून बैठकीत उपस्थित करण्यात आला. दरवर्षी देखभाल दुरुस्ती करूनही नवीन यंत्रणेची गरज काय असा सवाल स्थायी समिती सदस्या आणि शिवसेनेच्या नगरसेविका सरोज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना गेल्या सहा वर्षांत निवासाचा वापर नसल्यामुळे यंत्रणेची स्थिती अधिक बिघडल्याचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी स्पष्ट केले. तसेच ही यंत्रणा 20 वर्षांपूर्वी बसविण्यात आल्याने कार्यक्षमता घटल्याने नवीन यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरदवाड यांनी सांगितले. त्यामुळे अनिवासी महापौर बंगल्यावर होणाऱ्या खर्चाने ऐन उन्हाळ्यात करदात्यांना मात्र हुडहुडी भरली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai