महात्मा बसवेश्वरांचा विश्वशांतीचा संदेश: काळाची गरज
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 21, 2026
- 44
रासायनिक महाभयानक अण्वस्त्रांच्या वापराने पश्चिम आखाती परिसर इराण, लेबनॉन, इस्रायल व आजूबाजूचे देश सध्या होरपळून निघाले असून भविष्यात याचे खूप भयंकर परिणाम संपूर्ण विश्वाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकमेकांवर वरचढ होण्याच्या भयंकर महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या अनेक देशांकडून भयानक अस्त्रांची निर्मिती केली गेली आणि अनेक देशाला विकली गेली. त्याचे परिणाम आज आपण पाहतो आहोतच. काही देशांच्या या विनाशकारी कृत्यामुळे संपूर्ण वसुंधरेलाच धोका पोहोचत आहे. इतका पराकोटीचा द्वेष एकमेकांच्या विषयी का वाढत आहे? आपण एकमेकांचा इतका तिरस्कार का करत आहोत? जीवन जगण्याचा समाधानी मार्ग आपण खरंच विसरलो आहोत की काय? काय कारण असावे? समाजामध्ये असणारी प्रचंड सामाजिक आणि आर्थिक विषमता हे प्रमुख कारणांपैकी एक कारण असू शकते. स्वातंत्र्याची गळचेपी, समतेचा अभाव आणि बंधुतेच्या भावनांची आपल्यामध्ये असणारी कमतरता ह्यामुळे संपूर्ण जगामध्ये असंतोषाच्या वाढीला दुर्दैवाने बळ मिळते आहे. झपाट्याने होणाऱ्या विकासाबरोबर संपूर्ण सृष्टीच्या विनाशाची भीतीही सतावते आहे.
देहाच्या कोणत्याही भागाला दुखापत झाल्यास जसे संपूर्ण शरीराला वेदना अनुभवावी लागते तसेच या पृथ्वीच्या भूमीवर कुठेही काही अवचित घडले तर त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचतेच. जगात शांतता नांदावे यासाठी प्रत्येकाने आता प्रयत्न करणे गरजेचे आहे. थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात आपल्या कार्याद्वारे आणि वचन साहित्याद्वारे जागतिक शांती स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. बाराव्या शतकात समाजामध्ये भयंकर विषमता होती, अस्पृश्यता, लिंगभेद, वर्णभेद, समाजामध्ये असणारी पराकोटीची अंधश्रध्दा यात समाज पूर्णतः होरपळून निघत होता. अशा अत्यंत प्रतिकूल काळात महात्मा बसवेश्वरांनी समाजामध्ये क्रांती घडवली. वर्णभेद आणि लिंगभेद यांना मूठमाती देऊन अनेक जाती-पातीत विखुरलेल्या समाजाला एकत्र आणले. ‘कोणीही नीच नाही आणि कोणीही उच्च नाही आपण सर्वजण समान आहेत.’ महात्मा बसवेश्वरांनी दिलेल्या मानवतेच्या या संदेशाने समाजातील शेवटचा घटक सुद्धा समाज सुधारणा क्रांतीच्या मुख्य प्रवाहात सामील झाला. अशाप्रकारे प्रत्येक घटकाला सोबत घेवून आजच्या संसदीय कार्यप्रणालीसारखे असणारी अनुभव मंटप ची स्थापन केली आणि अशाप्रकारे जगातील पहिली लोकशाहीची बीजे समाजामध्ये सर्वप्रथम महात्मा बसवेश्वरांनी रुजवली. वंचित घटकाबरोबर इतरांनाही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ची त्रिसूत्री संकल्पना प्रत्यक्षात अनुभवयास मिळाली. आपले काम हेच आपले दैवत हा महामंत्र महात्मा बसवेश्वरांनी समाजमनामध्ये बिंबवले. कष्टकरांच्या श्रमाला महात्मा बसवेश्वरांनी सन्मान प्राप्त करून दिला. समाजात असणाऱ्या अनेक अंधश्रद्धा तथा घातक रूढी-परंपरांना हद्दपार करून समाजाला शिक्षित केले, बाल विवाहाला विरोध केला. विधवां महिलांना पुन्हा लग्न करण्याची मुभा दिली, आंतरजातीय विवाह घडवले, स्त्री ला समाजामध्ये समान हक्क आणि अधिकार बहाल केले. संपूर्ण मानवजातीच्या रक्षणासाठी महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनामध्ये म्हणतात, “दयेविना धर्म कोणता आहे देवा? सर्व प्राणीमात्रांवर दया पाहिजे, दया हेच धर्माचे मूळ आहे.“ या उदात्त संदेशाचे मर्म आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. महात्मा बसवेश्वरांनी अत्यंत प्रगतीशील आणि समाजाभिमुख धोरण आखून अनुभव मंटप च्या माध्यमातून सर्व समाजासाठी मानवतावादी संविधान निर्माण केले आणि ह्याच संविधानाच्या पायावर महात्मा बसवेश्वरांनी एक आदर्श समाजरचनेची उभारणी केली. समाजातील विषमता नष्ट झाल्यास आदर्श समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही हे महात्मा बसवेश्वरांना ज्ञात असावे म्हणूनच आज महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त असे म्हणावेसे वाटते की, आज संपर्ण विश्वाला महात्मा बसवेश्वरांच्या विचारधारेची नितांत आवश्यकता आहे.
आनंद सोमेश्वर गवी (नवी मुंबई)
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai