कोकण भवनात लोकसेवा हक्क दिन उत्साहात साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2026
- 30
पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाची कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक पारदर्शक तसेच कालबद्ध पद्धतीने मिळाव्यात, या उद्देशाने आज 28 एप्रिल 2026 रोजी कोकण भवन येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये लोकसेवा हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोकण महसूली विभाग राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त बलदेव सिंह यांच्या नेतृत्वात आणि लोक सेवा हक्क दिनानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात कोकण भवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कामकाजात कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही, अशी ग्वाही देत सामूहिक शपथ घेतली. कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील तरतुदींचे पालन करत पात्र नागरिकांना विहित कालमर्यादेत आणि सौजन्याने सेवा देण्यास कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राज्य सेवा हक्क आयोगाच्या सह सचिव रिना फणसेकर यांच्या संकल्पनेतून कोकण भवनाच्या दर्शनी भागात या दिनाचे औचित्य साधून आकर्षक रांगोळी आणि माहितीपर स्टँडीज लावण्यात आल्या होत्या. तसेच, कामानिमित्त आलेल्या नागरिकांना लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रतींचे वाटप करून त्यांना कायद्याने प्रदान केलेल्या अधिकारांची माहिती देण्यात आली. या दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक कार्यालयात अधिसूचित सेवा आणि शुल्काची माहिती देणारे, तसेच तक्रार नोंदवण्यासाठीचे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सेवादूत योजना सुरू करण्यात आली असून, नागरिकांना द्वारे आपले सरकार पोर्टल आणि कायद्याची माहिती देऊन जागृत करण्यात आले. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवादांचे आयोजन करून तरुण पिढीत या कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, भारत स्काऊट, एन.सी.सी. आणि एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. उत्कृष्ट काम करणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
हा अधिनियम एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे नमूद करत, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकतेने, निष्ठेने आणि संवेदनशीलतेने पार पाडण्याची शपथ घेतली. प्रशासकीय सेवा देताना नागरिक केंद्रबिंदू मानून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता साध्य करण्याच्या या संकल्पामुळे सर्वसामान्यांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai