सुपर स्वच्छ शहरासाठी पालिका सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2026
- 23
नागरिकांना स्वच्छताविषयक अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन
नवी मुंबई ः ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई आता नियमित क्रमवारीपेक्षा वरच्या दर्जावर ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटगरीमध्ये समाविष्ट असून ‘सुपर स्वच्छ शहरा’चा मिळालेला बहुमान अभिमानास्पद आहे. आपले मानांकन कायम राखणे ही आपली जबाबदारी असून त्यासाठी सर्वेक्षणांतर्गत एकूण गुणांपैकी 85 टक्के गुण मिळविणे गरजेचे आहे. नागरिकांच्या संपूर्ण सहयोगाने स्वच्छतेचे ‘सुपर स्वच्छ लीग’ मधील मानांकन कायम राखण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत महापौर सुजाता पाटील आणि सर्व नगरसेवकांसमोर आयुक्तांनी स्वच्छतेची चळवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय यशस्वी होणे शक्य नाही त्यामुळे याकामी नागरिकांचे संपूर्ण सहकार्य आणि सक्रिय सहभाग मिळण्यासाठी तसेच सर्वेक्षणांतर्गत सर्व नागरिकांनी अभिप्राय नोंदवावा याकरिता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षणा’मध्ये नवी मुंबई देशात सातत्याने अग्रभागी राहिलेली असून सन 2021 मध्ये देशात चौथा, सन 2022 मध्ये तिसरा, सन 2023 मध्ये तिसरा आणि सन 2024 मध्ये ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीमध्ये नवी मुंबईचा समावेश झालेला आहे. मागील वर्षीपासून जी शहरे सातत्याने पहिल्या 3 क्रमांकात येतात अशा शहरांची स्पेशल कॅटेगरी ‘सुपर स्वच्छ लीग’ या नावाने बनविण्यात आलेली आहे, जेणेकरून इतर शहरांना क्रमांक मिळविण्याची संधी मिळावी अशी माहिती देत या ‘सुपर स्वच्छ लीग’ कॅटेगरीमध्ये नवी मुंबईसह इंदौर, सुरत व विजयवाडा ही देशातील इतर 3 शहरे आहेत असे सांगितले. ‘सुपर स्वच्छ लीग’ कॅटेगरीमधील आपले मानांकन कायम राखणे ही आपली जबाबदारी असून त्यासाठी सर्वेक्षणांतर्गत एकूण गुणांपैकी 85 टक्के गुण मिळविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी 12500 गुणांची परीक्षा असून परीक्षण करताना ‘प्रत्यक्षदर्शी स्वच्छता अर्थात ’ ला प्राधान्य देण्यात येणार आहे. साधारणत: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षणाचे पाहणी पथक परीक्षणासाठी नवी मुंबईत दाखल होईल असा अंदाज असून यामध्ये ‘सिटी प्रोफाईल एरिया’तील विविध स्थळांना ते भेट देतील. तेव्हा प्रत्यक्ष पाहणीप्रमाणेच ते नागरिकांशीही संवाद साधतील आणि त्यांचे अभिप्राय जाणून घेतील अशी माहिती आयुक्तांनी दिली. नवी मुंबईने आजवरच्या प्रवासात स्वच्छ सर्वेक्षणामधील आपले राष्ट्रीय मानांकन नेहमीच उंचावत ठेवले आहे व राज्यातील प्रथम क्रमांक कायम राखला आहे. यामध्ये अर्थातच सर्व लोकप्रतिनिधींचा, नागरिकांचा आणि आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सर्वात महत्वाचा वाटा राहिला असे सांगतानाच गृहनिर्माण संस्था, वसाहती, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सारख्या नामांकीत स्वयंसेवी संस्था, मंडळे आणि व्यक्तिगत पातळीवर नागरिकांचाही मोठया प्रमाणात सहभाग लाभतो, यामुळेच हे यश लाभले आहे याचा आवर्जून उल्लेख आयुक्तांनी केला.
नगरसेवक हे लोकांचे प्रतिनिधी आहेत व त्यांच्या माध्यमातून दिला जाणारा संदेश किंवा केले जाणारे आवाहन हे नागरिकांना जास्त जवळचे असेल या भावनेतून सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना स्वच्छतेविषयी सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आयुक्तांनी यावेळी सभागृहाला केले. तसेच सध्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने नागरिकांचे स्वच्छताविषयक अभिप्राय अर्थात सिटीझन फिडबॅक घ्यायला सुरूवात झालेली असून नागरिकांनी .. या वेबसाईट लिंकवर जाऊन किंवा स्वच्छता ॲप, तसेच या तीन ॲपचा वापर करुन त्यावर शहर स्वच्छतेशी संबंधित 13 प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे देण्याकरिता नागरिकांना प्रेरीत करावे असेही आवाहन आयुक्तांनी याप्रसंगी नगरसेवकांना केले. नवी मुंबई शहराचा स्वच्छ, सुंदर व राहण्यायोग्य शहर म्हणून दर्जा टिकविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून नागरिकांच्या संपूर्ण सहयोगाने स्वच्छतेचे आपले ‘सुपर स्वच्छ लीग’ मधील मानांकन कायम राखण्यासाठी एकत्रित येऊन काम करूया असे आवाहन याप्रसंगी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai