शिक्षण रूपांतरण धोरणाविरोधात याचिका
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2026
- 27
अंमलबजावणीस स्थगिती देण्याची विजय चौगुले यांची न्यायालयाकडे मागणी
नवी मुंबई ः मार्चमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी आणलेल्या ‘शिक्षण रूपांतरण धोरण-2026’ हा वादाचा विषय ठरला आहे. सभेत चर्चेदरम्यान मनसे, शिवसेनेने या धोरणाला विरोध केला होता. मात्र सत्ताधाऱ्यांनी बहुमतांनी हा ठराव मंजुर केला. यावरुन आता राजकीय वाद तीव्र झाला आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदर प्रस्ताव मनमानी, बेकायदेशीर व अधिकारबाह्य असल्याचा दावा करत, त्याच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती देण्याची विनंतीही न्यायालयाकडे केली आहे.
20 मार्च 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकाकडून ‘शिक्षण रूपांतरण धोरण-2026’ प्रस्ताव मांडण्यात आला होता. यामध्ये या शैक्षणिक वर्षापासून पालिकेच्या सर्व शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र सरसकट मराठी शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरु करण्याला अनेकांचा आक्षेप होता. पालिकेच्या शिक्षण रूपांतरण धोरणावरून राजकीय वाद तीव्र झाला असून, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे धोरण रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. संबंधित प्रस्ताव मनमानी, बेकायदेशीर व अधिकारबाह्य असल्याचा दावा करत, त्याच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती देण्याची विनंतीही न्यायालयाकडे केली आहे. महापालिका मुख्यालयात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चौगुले यांनी ही माहिती दिली. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात पुरेशी चर्चा न करता प्रस्ताव मांडण्यात आल्याचा आक्षेपही याचिकेत नोंदवण्यात आला आहे. महानगरपालिका हद्दीत सुमारे 80 मराठी शाळा असून, त्यामध्ये सुमारे 60 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या धोरणाअंतर्गत मराठी माध्यमाच्या शिक्षणावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त होत असून, यावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वावर गदा येईल, अशी भीती व्यक्त करत चौगुले यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला. मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमाचा पर्याय उपलब्ध ठेवण्यास हरकत नसली, तरी मराठी शिक्षण बंद करण्याचा कोणताही प्रयत्न मान्य केला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. महापालिका प्रशासनाने हे धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन उभारेल, असा इशारा देतानाच वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण करण्याची घोषणाही चौगुले यांनी केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai