राज्यात 15 वर्षांनी जनगणना सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 22
दोन टप्प्यांत प्रक्रिया; स्व-गणनेचा पर्याय
मुंबई : सन 2011 नंतर प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रीय जनगणनेला 1 मे पासून राज्यात सुरुवात झाली आहे. दोन टप्प्यांत या जनगणनेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विशेष म्हणजे, जनगणना 2027 ही देशातील पहिली डिजीटल जनगणना असून स्व-गणना करण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. तसेच या जनगणना मोहिमेत पहिल्यांदाच जातनिहाय गणना आणि कुटुंबामध्ये प्रामुख्याने सेवन केल्या जाणाऱ्या धान्याची माहितीही गोळा केली जाणार आहे.
राज्याच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, पहिल्या टप्प्यात स्व-गणना केली जाणार असून, 1 मे ते 15 मे या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीत दुसऱ्या टप्प्यांतर्गत घर यादी आणि घरगणना पूर्ण केली जाणार आहे. याशिवाय पहिल्यांदाच जनगणना मोहिमेत जातनिहाय गणना आणि कुटुंबामध्ये प्रामुख्याने सेवन केल्या जाणाऱ्या धान्याची माहितीही गोळा केली जाणार आहे. नागरिकांना स्व-गणना करण्यासाठी हीींंीि://ीश.लशर्पीीी.र्सेीं.ळप हे स्वतंत्र पोर्टल 1 मे ते 15 मे या कालावधीत कार्यरत राहील. शिवाय मोबाइल ॲपच्या माध्यमातूनही स्व-गणना करता येणार आहे. घरातील कोणताही एक सदस्य सुमारे 15 ते 20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करू शकतो. अर्ज सादर केल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा ई-मेलवर स्व-गणना आयडी प्राप्त होईल. स्व-गणना करताना कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. या स्व-गणनेत एकूण 33 प्रश्नांची विचारणा करण्यात येणार आहे. त्यात घराची स्थिती, कुटुंब प्रमुख, नाव, पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत, प्रकाशाचा मुख्य स्त्रोत, कुटुंबात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या, कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतरपैकी आहे का? यासारख्या प्रश्नांचा समावेश असेल.’
स्व-गणना प्रक्रिया ऐच्छिक असून ती बंधनकारक नाही. ही स्वगणना नागरिक आपल्या मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून घर, कार्यालय अथवा अन्य कोणत्याही ठिकाणाहून करू शकतात. मात्र कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती स्वगणनेसाठी नोंदणी करू शकतो. ही प्रक्रिया सोपी, जलद, सुरक्षित असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असलेल्या जनगणना 2027 प्रक्रियेची नवी मुंबईमध्ये जोरदार तयारी सुरू झालेली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही नागरिकांना या महत्वपूर्ण राष्ट्रव्यापी उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
- 2.64 लाख क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
घरगणना करण्यासाठी राज्यभरात सुमारे 2.64 लाख क्षेत्रीय अधिकारी म्हणजेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे सर्व अधिकारी जणगणनेसाठी तैनात केले जाणार आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 141 मास्टर प्रशिक्षकांना पुण्यातील ‘यशदा’ मार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यात जनगणना कार्य संचालनालयाच्या पाच राष्ट्रीय प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. - जातनिहाय नोंदही केली जाणार
यंदा पहिल्यादांच जातनिहाय नोंदही जनगणनेच्या प्रक्रियेदरम्यान केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात पूर्ण केली जाणार असल्याने त्याबाबत केंद्र सरकारने सविस्तर माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेत नेमके काय असणार आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याशिवाय यंदा पहिल्यांदाच कुटुंबामध्ये प्रामुख्याने सेवन केल्या जाणाऱ्या धान्यांची नोंदही केली जाणार आहे. या संदर्भातील माहितीही दुसरा टप्पा सुरू होण्याच्या अगोदर जाहीर करण्यात येणार आहे.
- दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घरगणना
या प्रक्रियेतील घर यादी आणि घरगणना मोहीम 16 मे ते 14 जून या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. या प्रक्रियेत जनगणना गणक घरी भेट देऊन स्व-गणनेतील संपूर्ण माहिती तपासून पडताळणी करतील. स्व-गणना पूर्ण झाल्यानंतर जो ‘एसई’ क्रमांक दिला जाणार आहे, तो पडताणीदरम्यान दिल्यानंतर अवघ्या काही वेळात दिलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण पूर्ण केले जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai