कोंडी संपणार प्रवासाची लिंक लागणार
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 19
मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण; मुंबई-पुणे प्रवास 6 किमी ने कमी होणार
मुंबई ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. या प्रकल्पामुळे पुण्याला जाण्याच्या वेळेत अर्ध्यातासाची बचत होणार असून प्रवाशांना वाहतुक कोंडीलाही आता सामोरे जावे लागणार नाही. मिसिंग लिंक हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत अविष्कार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 6,700 कोटी खर्च करून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट भागाला वळसा घालून मिसिंग लिंक प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात दोन बोगदे, दोन उड्डाणपूल आणि टायगर व्हॅलीवरील एका केबल-स्टेड पुलाचा समावेश आहे. आधुनिक 19.16 किमी लांबीच्या कॉरिडॉरचा या प्रकल्पात खालापूर आणि खोपोली इंटरचेंज दरम्यानच्या 5.86 किमी लांबीच्या सहा-पदरी विभागाचे आठ-पदरी रुंदीकरण देखील समाविष्ट आहे. नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून हे बोगदे बांधण्यात आले असून, त्यासाठी सह्याद्री पर्वतरांगांमधील विविध खडकाळ रचनांचा विस्तृत भूवैज्ञानिक अभ्यास करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे द्रुतगती मार्ग पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित होऊन घाट विभागातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.
गेली अनेक वर्षे पुर्णत्वाच्या प्रतिक्षेत असलेल्या या मिसिंग लिंकचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी द्रुतगती मार्गाच्या खालापूर टोकावर उद्घाटन केले व त्यानंतर प्रकल्पाच्या लोणावळ्याकडे जाणाऱ्या मार्गावरून वाहन चालवले. वाहनात त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 20 ते 30 मिनिटांनी वाचेल. सुरुवातीला, नवीन मार्गावर फक्त हलकी मोटार वाहने आणि बसेसनाच परवानगी दिली जाईल, तर सुरक्षिततेच्या कारणास्तव अवजड मालवाहू वाहने सध्याच्या घाट मार्गाचाच वापर करत राहतील. रायगड जिल्ह्यातील खालापूर टोल प्लाझासह या प्रकल्पाअंतर्गत कोणतीही टोलवाढ प्रस्तावित नाही.
शुक्रवार, शनिवार व रविवार असा सलग तीन दिवसांचा सुट्टीचा कालावधी आल्याने या उद्धाटनाच्यावेळी प्रचंड वाहतुक कोंडी खंडाळा घाटात पाहायला मिळाली. उद्धाटन झाले असले तरी सदर मार्गिकेचे 94 टक्के काम पुर्ण झाले असून अजून 6 टक्के काम अपुर्ण असल्याने प्रवाशांना या मिसिंग लिंक वरुन प्रवास करता येणार नाही. त्यामुळे मार्गिकेचे काम पुर्णत्वास गेल्यावरच तिचे उद्धाटन केले असते तर बरे झाले असते अशी प्रतिक्रिया वाहतुक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली.
- मिसिंग लिंक ऐवजी कनेक्टिंग लिंक करा-फडणवीस
मिसिंग लिंकचं लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री भाषणात म्हणाले की, आम्ही पाहिलेले एक स्वप्न पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे नाव बदलून आता मिसिंग लिंक ऐवजी कनेक्टिंग लिंक करा अशी सूचना मी प्रशासनला करत आहे. आम्ही लवकरच या प्रकल्पाचे नाव ठरवू. या प्रकल्पाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. जमिनीवर उभारलेला हा पूल म्हणजे अभियांत्रिकी चमत्कार आहे.
महामार्गाची वैशिष्ट्ये
- मुंबई आणि पुण्यातील प्रवासासाठी लागणारी वेळ यामुळे 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे. शिवाय यामुळे खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीलाही बगल देता येईल.
- केबल-स्टेड ब्रिज: प्रकल्पात 650 मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रिज असून त्याच्या पूल पायलॉन उंची 182 मीटर आहे, जो भारतातील सर्वात उंच रस्त्यावरील पूल ठरला आहे.
- वेळेची बचत: घाट क्षेत्रातील वळणावळणाचे रस्ते आणि वाहतूक कोंडी टाळल्यामुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या घटवण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून या प्रकल्पामुळे आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती मिळणार आहे.
- मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद
मिसिंग लिंक हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना मानला गेला आहे. यातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा आहे, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या 180 मीटर खालून खोदण्यात आला आहे. या प्रकल्पाची नोंद लिम्का बुकमध्ये करण्याच्यासाठीही पाऊले उचलली आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai