शाळा प्रवेशाचा आनंदोत्सव
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 24
नवी मुंबई ः पताका, रांगोळ्या यांनी सजवलेल्या शाळा, कुठे ढोल ताशांचा तर कुठे लेझीमचा गजर अशा उत्साही वातावरणात नवी मुंबई महापालिकेच्या 57 प्राथमिक आणि 23 माध्यमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव समारंभ जल्लोशात संपन्न झाला. नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये महापालिका पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, अधिकारी यांनी उपस्थित राहून गुलाबपुष्प व चॉकलेट देत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिला दिवशी स्वागत केले.
राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी महापौर सुजाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत यांच्यासह वाशी से.14,15 येथील नमुंमपा शाळा क्र.28 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी नव्याने सुरु होत असलेल्या बालवाटीका नर्सरी इंग्रजी माध्यम वर्गाचा शुभारंभ संपन्न झाला. तसेच गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नमुंमपा शाळा क्र.15 शिरवणे गाव या ठिकाणी उपस्थित रहात शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदाने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी तसेच शाळेमध्ये मुलांची उपस्थिती आणि गुणवत्ता या दोन्हीमध्ये भरीव वाढ व्हावी या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शाळा प्रवेशोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला असून आनंददायी वातावरणात दडपण विरहित शिक्षण ही भूमिका जपली जात आहे. यावेळी पहिल्यांदाच शाळा प्रवेश घेतलेल्या लहान मुलांच्या पायाचे ठसे कोऱ्या कागदावर घेण्यात आले. या संकल्पनेचे कौतुक करीत गणेश नाईक यांनी मुलांच्या पावलांचे हे ठसे त्या विद्यार्थ्यासाठी मोठे झाल्यावर अनमोल ठेवा असेल अशी भावना व्यक्त केली. यावेळी अनेक शाळांमध्ये उभारलेल्या सेल्फी स्टँडवर विद्यार्थ्याची छायाचित्रे काढून पालकांनीही विद्यार्थ्यांसमवेत आनंद साजरा केला. काही शाळांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी शालेय पोषण आहार सुविधा व इतर सुविधा, शाळा व्यवस्थापन समिती, 100 टक्के पट नोंदणीसाठी गृहभेटी, विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांवर स्वच्छतेच्या सवयींचे संस्कार व्हावेत व त्यांना अभ्यासासोबतच क्रीडा व कला गुण फुलविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करावे अशा सूचना मान्यवरांमार्फत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना करण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai