असंसर्गजन्य आजारांविरोधात प्रभावी मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 24
नवी मुंबई ः आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच विविध प्रकारचे कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग तपासणी व नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध प्रकारची कार्यवाही करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग तपासणी व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 30 वर्षांवरील स्त्री-पुरुषांची नियमित तपासणी करण्यात येत असून, संबंधित माहिती शासनाच्या ‘डिजिटल पोर्टल’वर नोंदविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांची तपासणी व चाचण्या करण्यात येत आहे. तसेच संशयित रुग्णांना पुढील उपचारांसाठी सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथील ऑन्कोलॉजी विभागात संदर्भित करण्यात येते. याविषयी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फत सातत्याने आढावा घेतला जात आहे.
यामध्ये 30 वर्षांवरील नागरिकांची घरभेटीद्वारे तसेच आरोग्य केंद्रांवर नोंदणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान एखाद्या व्यक्तीस उच्च रक्तदाब किंवा त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळल्यास तात्काळ उपचार सुरू करण्यात येतात. महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा व स्तनाचा कर्करोग तसेच पुरुषांमध्ये मुख कर्करोगाची प्राथमिक तपासणी केली जाते. ‘पोर्टल’वर नोंदणी झालेल्या सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार व नियमित पाठपुरावा सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच डिजिटल हेल्थ आयडी लिंक करण्यात येतो.
- आशा स्वयंसेविकांची महत्त्वपूर्ण भूमिका
आशा स्वयंसेविका आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांशी थेट संपर्क साधून विविध महत्त्वाची कामे करीत आहेत. यामध्ये त्यांच्यामार्फत 30 वर्षांवरील प्रत्येक नागरिकासाठी ‘कम्युनिटी बेस्ड असेसमेंट चेकलिस्ट’ फॉर्म भरला जातो. उपचार सुरू असलेल्या रुग्णांनी वेळेवर औषधे घेतली की नाही यासाठी नियमित गृहभेटी दिल्या जातात. संशयित नागरिकांची एएनएम मार्फत डिजिटल बीपी मशीन व ग्लुकोमीटरच्या सहाय्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेची मोफत तपासणी केली जाते. 30 वर्षांवरील महिलांमध्ये गर्भाशय मुख व स्तन कर्करोगाचे प्राथमिक परीक्षण केले जाते. तपासणी केलेल्या प्रत्येक नागरिकाची माहिती शासनाच्या अधिकृत डिजिटल पोर्टलवर नोंदवली जाते.
- वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी व उपचार प्रक्रियेवर नियंत्रण
या प्रक्रियेत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत आशा स्वयंसेविका व एएनएम यांनी स्क्रीनिंग करून पाठवलेल्या संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून अंतिम निदान केले जाते. राष्ट्रीय उपचार पद्धतीनुसार आवश्यक औषधे व डोस निश्चित करून उपचार सुरू करण्यात येतो. तोंड, स्तन व गर्भाशय मुख कर्करोगाच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जाते. पुढील तपासणी अथवा तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असल्यास रुग्णांना सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथे संदर्भित करण्यात येते. जुनाट आजार असलेल्या रुग्णांची दरमहा तपासणी करून त्यांच्या प्रकृतीचा व औषधांच्या परिणामांचा आढावा घेतला जातो.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai