हिरानंदानी समुहाला 25 कोटींचा दंड
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 20, 2026
- 36
गौणखनिज उत्खनन प्रकरणी तहसीलदारांची नोटीस
ठाणे ः ठाणे महापालिका क्षेत्रातील मौजे कोलशेत येथे तात्पुरता परवाना गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी हिरानंदानी समुहाच्या मे. रोमा बिल्डर्स प्रा.लि. यांना 25.86 कोटींच्या दंडाची नोटीस तहसीलदार रेतीगट ठाणे यांनी बजावली आहे. सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांचेकडे सुनावणी सुरु असल्याने अंतिम निर्णय घेता येत नसल्याचा खुलासा तहसीलदार उमेश पाटील यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांना केला आहे. दरम्यान, या प्रकरणात उप विभागीय अधिकारी कोणता निर्णय देतात यावर दंडाची आकारणी होणार असल्याचे तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले.
हिरानंदानी यांचे ठाणे पालिका क्षेत्रातील कोलशेत व कावेसर याठिकाणी विशेष नगर वसाहतीचे काम 2010 पासून सुरु आहे. याव्यतिरिक्त हिरानंदानी ईस्टेट हा ठाण्यातील मोठा गृहप्रकल्पही या विशेष नगर वसाहतीलगत हिरानंदानी यांनी वसवला आहे. या गृहप्रकल्पात गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार (रेतीगट) कार्यालय ठाणे यांनी तत्कालीन तलाठी यांनी सादर केलेल्या अहवालावर मे. रोमा बिल्डर्स प्रा.लि. यांना 2014 पासून 2020 पर्यंत 10 प्रकरणात आदेश करुन सुमारे 25.86 कोटींच्या दंडात्मक नोटीसा बजावल्या आहेत.
एसआर-145/2013 मध्ये रु. 44 लाख 39 हजार 354, एसआर-9/2014 प्रकरणात रु. 5 कोटी 91 लाख 72 हजार 713, एसआर-56/2015 मध्ये रु. 4 कोटी 54 लाख 78 हजार 806, एसआर-185/2016 रु. 5 कोटी 38 लाख 68 हजार 186, एसआर-216/2016 रु. 51 लाख 15 हजार 476, एसआर-3/2017 रु. 3 कोटी 23 लाख 50 हजार 670, एसआर-23/2017 रु. 1 कोटी 92 लाख 38 हजार 638, एसआर-17/2017 रु. 8 लाख 29 हजार 597 तर एसआर-51/2020 रु. 3 कोटी 77 लाख 45 हजार 575 या सर्व प्रकरणात सुनावणी होऊन 2025 मध्ये आदेश पारित झाल्यानंतर तहसीलदार रेतीगट यांनी 25.96 कोटी रुपयांच्या दंड वसूलीच्या नोटीसा दि. 6 मार्च 2026 रोजी बजावल्या आहेत. याबाबत मे. रोमा बिल्डर्स प्रा.लि. यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या असून न्यायालयाने उप विभागीय अधिकारी ठाणे यांना संबंधित प्रकरणात 90 दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी उपविभागीय अधिकारी उर्मिलापाटील यांनी सुनावणी घेतली असून लवकरच ते याप्रकरणात आपले आदेश देतील असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. सदर दंडात्मक रक्कम ही संबंधित वर्षांच्या दंडाच्या परिपत्रकानुसार आकारली असून त्यावरील व्याज गृहित धरल्यास ही रक्कम 50 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, उप विभागीय अधिकारी हिरानंदानी समुहाला शासकीय दणका देतात की दिलासा देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai