दिबांच्या नावासाठी मी आजही नेतृत्व करायला तयार
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2026
- 29
भारतीताई पोवार यांचे प्रतिपादन
उरण ः अत्याधुनिक सेवा सुविधाने परिपूर्ण असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन सहा महिने झाले, आता लवकरच आंतरराष्ट्रीय विमाने उडतील, परंतु दि. बा. पाटील साहेब यांचे नाव विमानतळाला दिले गेले नाही, ही शोकांतिका आहे. कारण सरकारला दिबांच्या नावाची एलर्जी आहे. त्यांना त्यांच्या बॉसचे नाव द्यायचे आहे, अशी घणाघाती टीका 1984 च्या गौरवशाली आणि शौर्यशाली ऐतिहासिक आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार यांनी दिबांना जासई येथे अभिवादन केल्यानंतर केली. दिबांचा स्मृतिदीन असल्याने कोल्हापूरवरून भारतीताई दिबांना अभिवादन करण्यासाठी आल्यात होत्या. जासई येथे दिबांच्या आठवणी दाटून आल्याने भारतीताई अश्रू अनावर झाले.
जासईनंतर त्यांनी पनवेल येथील संग्राम बंगल्यावर दिबांना अभिवादन केले. सोबत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत होते. यावेळी दिबांची सून मनीषा पाटील यांनी भारतीताईंचे स्वागत केले. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, “1984 च्या आंदोलनावेळी मी ऐन तारुण्यात म्हणजे 23 वर्षांची होती. वयाच्या अकराव्या वर्षापासून मी शेकापची कार्यकर्ती म्हणून काम करीत होते. त्यामुळे नसानसांत आंदोलने भिनलेली होती. साहजिकच दिबांचा आदेश शिरसावंद्य मानून आंदोलनासाठी कशाचीही तमा न बाळगता आले होते. दिबांसहित बहुतांश नेते सरकारने तुरुंगात डांबले होते. त्यामुळे तत्कालीन सरकारला हे आंदोलन यशस्वी होईल, याची सुतराम शक्यता नव्हती. दि. बा. पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच शेतकऱ्यांना काहीअंशी न्याय मिळाला, कालांतराने साडेबारा टक्के जमिनीचे सूत्र देशभर लागू झाले दिबांमुळे. तसेच मंडल आयोगाचा लढाही दिबांनी यशस्वी केला. त्यामुळे ओबीसी समाजाला फायदा झाला, परंतु ओबीसी समाजाला दिबांचे महत्त्व समजलेच नाही, असे मला वाटते. दि. बा. पाटील साहेब हे देशाचे तत्वांशी जगलेले नेते, परंतु आताच्या सरकार केवळ मिंधे हवेत. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून आयुष्य वेचणारा दिबांसारखा नेता चालत नाही, असे सध्याचे सरकारचे आचरण पाहता मला वाटते. वास्तविक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगीच दिबांचे नाव लागायला हवे होते, पण सरकारने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला, हे माझे ठाम मत आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळ नावासाठी जर तरुण पेटून उठले, तर मी नेतृत्वाची धुरा सांभाळायला तयार आहे, असे भारतीताई पोवार म्हणाल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai