टेनिसपटू आरव छल्लानी भारतात अव्वल
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 25
नेरुळ जिमखान्यातील आरवची अंडर-14 मध्ये दमदार कामगिरी
नवी मुंबई : नेरुळ जिमखान्याचा उदयोन्मुख टेनिसपटू आरव छल्लानी याने आपल्या सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीच्या जोरावर भारतातील 14 वर्षांखालील (अंडर-14) मुलांच्या गटात भारताचा क्रमांक 1, तर आशियातील क्रमांक 2 खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे.
आरवच्या यशस्वी प्रवासाला एप्रिल 2026 मध्ये जयपूर येथे झालेल्या आशियाई कॅटेगरी 1+ अंडर-14 स्पर्धेत मोठी गती मिळाली. या स्पर्धेत त्याने एकेरीचे विजेतेपद, तर दुहेरीत उपविजेतेपद पटकावत महत्त्वाचे गुण मिळवले. या कामगिरीच्या जोरावर मे 2026 मध्ये तो भारताचा अव्वल अंडर-14 टेनिसपटू ठरला. यानंतर आरवने आशियाई टेनिस महासंघाच्या स्पर्धांमध्ये सलग तीन आठवड्यांत उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली.
एटीएफ ग्रेड-ए (पूर्व आशिया, चीन) दुहेरीचे विजेतेपद- एकेरीत उपांत्य फेरी, एटीएफ कॅटेगरी-ए (मध्य आशिया, उझबेकिस्तान) दुहेरीत उपविजेतेपद आणि एटीएफ ग्रेड-ए (दक्षिण आशिया, हैदराबाद) दुहेरीचे विजेतेपद- एकेरीत उपविजेतेपद या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आरवने आशियातील अव्वल खेळाडूंविरुद्ध महत्त्वपूर्ण गुणांची कमाई करत आशियात दुसरा क्रमांक मिळवला. त्याचबरोबर भारतातील अंडर-14 गटातील अव्वल खेळाडू म्हणून त्याचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. यशाबद्दल आरव छल्लानी म्हणाला “प्रत्येक स्पर्धेत माझ्यासोबत प्रवास करून कोर्टवर आणि कोर्टबाहेर सातत्याने मार्गदर्शन करणारे माझे प्रशिक्षक गितेश अवस्थी सर यांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या आई-वडिलांनी केलेले त्याग, प्रायोजकांनी दिलेले पाठबळ आणि नेरुळ जिमखान्याने उपलब्ध करून दिलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा व सरावासाठीचे उत्तम वातावरण यामुळेच हे यश शक्य झाले. या यशामुळे आणखी मेहनत घेऊन भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
नेरुळ जिमखान्याचे सरचिटणीस विकास शेट्टी हे म्हणाले की, नेरुळ जिमखाना टेनिस अकादमीत प्रशिक्षक गितेश अवस्थी यांच्या मार्गदर्शनाखाली आरवने हे यश संपादन केले आहे. त्याची जिद्द, शिस्तबद्ध सराव आणि दर्जेदार प्रशिक्षण व्यवस्थेचे हे फलित आहे. नेरुळ जिमखान्यासाठी तसेच भारतीय टेनिससाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असून, भविष्यात आरव आणखी मोठी यशाची शिखरे गाठेल, असा आम्हाला विश्वास आहे. नेरुळ जिमखान्याचे उद्दिष्ट सर्व क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन उत्कृष्ट खेळाडू घडविणे हेच आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai