‘नैवेद्य’साठी लोकप्रतिनिधींचे रणकंदन
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 24, 2026
- 20
अग्निशमन विभागावर ठपका पण नगररचना विभागाला फटका; निलंबनाचा प्रस्ताव एकावर कारवाई मात्र दुसऱ्यावर
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या परवानगीत त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्यावर निलंबनाचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला होता. मात्र, सदर चुकीच्या परवानगीच्या अनुषंगाने भोगवटा प्रमाणपत्र बहाल करणाऱ्या सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांना कार्यमुक्त करण्याचा अजब ठराव पारित झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पालिका नगररचना विभागाकडून तोंडावर पडणार असल्याचे बोलले जाते.
सध्या नवी मुंबई महापालिकेत विविध विकासकामे आणि प्रशासकीय प्रस्तावांवरून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात मतभेद उघडपणे समोर येत आहेत. प्रत्येक सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींविरुद्ध पालिका प्रशासन असा बहुरंगी सामना पाहायला मिळत आहे. खरंतर सदर सामना हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री गणेश नाईक यांच्यात असून त्यामुळे मात्र पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला नाईक समर्थकांनी विरोध केला तर पामबीच मार्गावर एलईडी जाहिरात लावण्याचा प्रस्ताव हा नाईक समर्थक ठेकेदाराचा असल्याने त्याला आमदार म्हात्रे यांनी विरोध केला. तसेच, सरकार नियुक्त उपायुक्त राहुल गेठे यांच्यामार्फत शहरात एलईडीचा झगमगाट करण्याचा प्रस्ताव हा नाईक गटाने फेटाळुन लावला. वाशीतील बसडेपो भाड्याने देण्याचा प्रस्ताव ठेकेदार हा ठाण्यातील असल्याच्या कारणाने नाकारण्यात आला. या राजकीय संघर्षाचा परिणाम महापालिकेच्या विविध प्रकल्पांवर होत आहे. या कुरघोडीच्या राजकारणात महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची चिंता लोकप्रतिनिधींना नसल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर वाशीतील शिंदे सेनेचे लोकप्रतिनिधी अविनाश लाड यांच्या प्रभागातील ‘नैवेद्य’ या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण सध्या नाईक समर्थकांनी फारच मनावर घेतले आहे. अविनाश लाड यांना धडा शिकवण्याच्या ईर्षेने पेटलेल्या नाईक समर्थकांना त्या इमारतीत राहणाऱ्या नवी मुंबईकरांची कोणतीही चिंता नसल्याचे जाणवत आहे. बुधवारी झालेल्या विशेष सभेत फक्त नैवेद्य वरुन रंगलेल्या चर्चेत याचा प्रत्येय नवी मुंबईकरांना आला. चुकीचा ना हरकत दाखला देणाऱ्या अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यावर आणलेला निलंबनाचा प्रस्ताव तसाच राहिला आणि कारवाई मात्र भोगवटा प्रमाणपत्र देणाऱ्या सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांच्यावर करण्यात आली. या कारवाईसाठी नगरसेवक सुरज पाटील आणि निशांत भगत अग्रेसर असल्याचे जाणवले. त्यामुळे गणेश नाईक व एकनाथ शिंदे यांनी आपले राजकीय हित साधण्यासाठी नवी मुंबईचा वापर करु नये व नवी मुंबईकरांना ओलीस ठेवू नये अशी विनंती नवी मुंबईकर करत आहेत. दरम्यान, शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांवर राजकीय मतभेदांचा परिणाम होऊ नये आणि प्रशासनाने नियमांनुसार निर्णय घेऊन नागरिकांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नवी मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे.
- दीर्घ चर्चेनंतर केकाण कार्यमुक्त
नैवेद्य इमारतीला मिळालेल्या परवानग्यांयाविषयी बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत दीर्घ चर्चेनंतर सत्ताधाऱ्यांनी सुधारित ठरावाद्वारे सोमनाथ केकाण यांची सविस्तर चौकशी करून त्यांना सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करून मूळ विभागात परत पाठविण्याची शिफारस करण्यात आली. तसेच त्यांनी हाताळलेल्या इतर प्रकरणांमध्येही अशा प्रकारच्या अनियमितता झाल्या आहेत का, याचीही चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर विरोधकांनी सभागृहात गदारोळ करत सभात्याग केला. - भाजपमध्येअंतर्गत खदखद
नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या मोजक्याच नगरसेवकांना चर्चेत सहभागी करून घेतले जात असल्याने पक्षातील काही नगरसेवक नाराजी व्यक्त करत आहेत. प्रामुख्याने सभागृहनेते सागर नाईक, निशांत भगत, नेत्रा शिर्के आणि सुरज पाटील यांनाच चर्चेची संधी दिली जात असल्याने इतर नगरसेवकांना केवळ कोरम पूर्ण करण्यासाठी सभेला बोलावले जाते का? अशी खंत काही नगरसेवकांकडून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे काही नगरसेवकांनी केवळ सभेला हजेरी लावून निघून जाण्याची भूमिका घेतल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. तसेच, आ. गणेश नाईक हे या चार नगरसेवकांच्या सल्ल््यानुसार पक्षाचे कामकाज चालवत असल्याची कुजबुज काही ज्येष्ठ नगरसेवकांमध्येसुरु आहे. - पुरुषोत्तम जाधव यांच्या चौकशीची मागणी
शिंदेसेनेचे गटनेते मनोज हळदणकर यांनी विशेष सभेचा मूळ विषय पुरुषोत्तम जाधव असताना चर्चा मुद्दाम भरकटवून केकाण यांच्यावर केंद्रित केल्याचा आरोप केला. पुरुषोत्तम जाधव यांच्याविरोधात विविध गंभीर आरोप करत त्यांच्या नियुक्तीची, अनुभवाची आणि कथित अनियमिततेची स्वतंत्र चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास निलंबन, फौजदारी गुन्हा दाखल करणे आणि शासनाची आर्थिक हानी वसूल करण्याची मागणीही हळदणकर यांनी केली. विशेष महासभेतील ठराव आणि चर्चेनंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले असून, आता चौकशीतून नेमकी जबाबदारी कोणाची निश्चित होते, याकडे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai