सहा महिन्यांतच रस्त्याची चाळण
- by मोना माळी-सणस
- Aug 08, 2026
- 112
पहिल्याच पावसात डांबरीकरण उखडले; कंत्राटदारावर कारवाईची मागणी
नवी मुंबई : घणसोली सेक्टर-10 येथील संत निरंकारी चौकापासून घणसोली आगाराकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील डांबरीकरणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लाखो रुपयांचा खर्च करून केलेल्या डांबरीकरणाची पहिल्याच पावसात अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेला डांबरी थर आणि रस्त्यावर विखुरलेली खडी यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आला असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
घणसोली परिसरातील हा प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसभर मोठी वाहतूक असते. चेतक स्वीट, टेम्प्टेशन कॉर्नर, ‘आय लव्ह घणसोली’ सेल्फी पॉइंट तसेच अनेक निवासी संकुलांकडे जाण्यासाठी नागरिक याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था हजारो नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरली आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करून नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात डांबरीकरणाचा थर वाहून गेल्याने रस्त्याची पुन्हा चाळण झाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. उखडलेली खडी संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून अनेक वाहनांचे नुकसानही होत आहे.
विशेष म्हणजे, यापुर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांनी अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरच काम हाती घेण्यात आले होते. सुमारे सहा महिने काम सुरू राहिले; मात्र पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच रस्ता पुन्हा उखडल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक निधी खर्च करून करण्यात आलेले काम इतक्या कमी कालावधीत निकामी होणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची ये-जा असते. रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अशीच अवस्था होत असल्याने केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी आणि दर्जेदार काम करण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, तसेच रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस