कर्मवीरांनी गोरगरिबांपर्यंत शिक्षणाची दारे खुली केली
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2026
- 31
मगदूम दाम्पत्याला कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित
नवी मुंबई : समाजातील गोरगरीब, दीनदुबळ्या आणि वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवून बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे महान कार्य पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत समाजसुधारणेच्या दिशेने प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले.
वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात 22 सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई चौगुले, नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील हे माझे आदर्श असून त्यांच्या विचारांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. कर्मवीरांनी सुरू केलेल्या वसतिगृहात शिकण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आयुष्याच्या शेवटपर्यंत सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
- मगदूम दाम्पत्याचा गौरव
कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार’ डॉ. अजित मगदूम (अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, वाशी) यांना, तर ‘रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार’ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदूम यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी 25 हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ग्रंथ असे होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. अजित मगदूम यांनी नवी मुंबई परिसरातील व्यसनमुक्तीच्या कार्यातील विविध अनुभव आणि प्रसंग उपस्थितांसमोर मांडले. वृषाली मगदूम यांनी स्त्रीमुक्ती संघटनेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी व विविध प्रश्नांसाठी उभारलेल्या लढ्याची माहिती दिली. तसेच कचरावेचक महिलांसाठी केलेले काम हे अत्यंत आव्हानात्मक आणि संघर्षमय असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. आभार प्रदर्शन मॉडर्न स्कूलच्या मुख्याध्यापिका सुमित्रा भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन गमरे व प्रा. पूजा धयालकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मवीर जयंतीचे चेअरमन डॉ. सुनील जगधनी, उपप्राचार्या डॉ. राजेश्री घोरपडे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विश्वविक्रमवीर अंशुमन झिंगरनचा गौरवमहाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू अंशुमन झिंगरन याने जगातील प्रसिद्ध सात सामुद्रधुनी पोहून विश्वविक्रम केल्याबद्दल त्याचा रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी त्याला 11 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai