क्लस्टरवरुन सत्ताधाऱ्यांची नवी मुंबईत दुटप्पी भुमिका
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 02, 2026
- 30
बेलापुर मतदारसंघात पाठिंबा तर ऐरोलीत विरोध
नवी मुंबई ः महापालिका क्षेत्रातील पुनर्विकास हा क्लस्टर अंतर्गत करावा की पुनर्विकास नियमांर्तगत करावा या मुद्यावरुन सत्तधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी घणसोलीतील सिम्प्लेक्स क्लस्टर योजनेस विरोध दर्शवला असून त्याचवेळी मात्र बेलापुर मतदारसंघात नाईकांना अंधारात ठेवून क्लस्टरचा ‘सुरज’ तेजाने तळपत असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. झारीतीलशुक्राचार्यांच्या या दुटप्पी भुमिकेमुळे क्लस्टरवरुन तोंडघशी पाडण्याची खेळी खेळणाऱ्यांविरोधात नाईक काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सध्या क्लस्टर विरुद्ध स्वतंत्र पुनर्विकास या मुद्द्यावरून चांगलाच तापला आहे. घणसोलीतील सिम्प्लेक्स वसाहतीच्या क्लस्टर पुनर्विकासाला वाढीव एफएसआयमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण येण्याची शक्यता असल्याचे सांगत वनमंत्री गणेश नाईक यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एक संपुर्ण दिवस महासभा आयोजित करुन त्यावर यथेच्छ तोंडसुख घेतले. वकील नसले तरी सध्या वकीलांनाही मागे टाकणारे मुद्दे मांडत सभागृहनेते सागर नाईक यांनी सिम्पलेक्सच्या क्लस्टर मुद्यावरुन विरोधकांना चांगलेच कात्रीत पकडले. यावेळी झालेल्या चर्चेत सत्ताधारी नगरसेवकांनी विकासकाला 6500 कोटींचा नफा होईल त्याचा फायदा तेथील रहिवाशांना झाला पाहिजे अशी लोकहितधार्जिणी भुमिका घेतली. या संपुर्ण प्रकरणाचा व त्याचा पायाभुत सेवासुविधांवर पडणारा ताण याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा ठराव पारित करण्यात आला. विशेष म्हणजे घणसोलीतील सिम्प्लेक्स क्लस्टरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे नाईक यांनी क्लस्टरच्या वाढीव एफएसआयवर प्रश्न उपस्थित करत पायाभूत सुविधांचा सखोल अभ्यास करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीतील या दोन भूमिकांमधील विरोधाभास अधिक ठळक झाला आहे. एकीकडे शहराच्या पायाभूत सुविधांवरील संभाव्य परिणामांचा मुद्दा नाईकांनी उपस्थित केला असताना दुसरीकडे त्यांच्याच समर्थकांकडून बेलापुर मतदारसंघात क्लस्टरला चालना देण्याच्या हालचाली होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गणेश नाईकांना अंधारात ठेवून क्लस्टरचे राजकारण पुढे रेटले जात आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बेलापुर मतदारसंघातील खासकरुन वाशी व नेरुळ विभागात अनेक पुनर्विकास प्रकल्प क्लस्टर योजनेमार्फत विकसीत करण्याची योजना विकासकांनी आखली आहे. त्यासाठी या गटाने नाईकांचा क्लस्टर योजनेला असलेला विरोध कमी करण्यासाठी त्यांच्या जवळच्या नेत्यांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे. यात जर संबंधित नेते यशस्वी झाले तर क्लस्टरच्या विकासाचा सुरज बेलापुर मतदारसंघात तेजाने चमकेल अशी अपेक्षा विकासकांना आहे. परंतु, नाईक यांनी सदैव नवी मुंबईकरांच्याच हिताची भुमिका रस्त्यावर आणि सभागृहात घेतली असल्याने ते अशा प्रलोभनांना बळी पडणार नाहीत असा विश्वास नवी मुंबईकरांना आहे. त्यामुळे ऐरोली मतदारसंघातील घणसोली येथील समुह विकासास पायाभुत सुविधांवर पडणाऱ्या ताणामुळे विरोध करणारे गणेश नाईक बेलापुर मतदारसंघात तीच भुमिका कायम ठेवतील अशी अपेक्षा स्थानिकांना आहे. क्लस्टरच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपची नेमकी भूमिका काय आणि गणेश नाईकांची भूमिका बाजूला ठेवून निर्णय घेतले जात आहेत का, याबाबत नाईक पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai