स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 34
पाणीपुरवठा, मलनिःस्सारण, स्वच्छता, रस्ते व सुरक्षेसह विविध कामांना हिरवा कंदील
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा 29 सप्टेंबर रोजी महापालिका मुख्यालयात स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा, मलनिःस्सारण, स्वच्छता, रस्तेसफाई, सुरक्षाव्यवस्था, विद्युत रोषणाई तसेच विविध विकासकामांशी संबंधित अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली.
खारघर, कळंबोलीतील कामांना मंजुरीमहापालिका हद्दीतील कळंबोली येथील धारण तलावावर पंपिंग स्टेशन उभारणे व अन्य अनुषंगिक कामे करण्यास समितीने मंजुरी दिली. तसेच खारघर-कोपरा, सेक्टर 15 येथील प्लॉट क्रमांक 25 ला संरक्षण भिंत बांधणे, विरंगुळा केंद्राच्या इमारतीवर शेड उभारणे व संबंधित कामांना मान्यता देण्यात आली.खारघर नोडमधील सिडकोने विकसित केलेल्या मलनिःस्सारण वाहिन्यांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती, सुधारणा व नूतनीकरण करण्याच्या कामाच्या सुधारित प्रशासकीय खर्चासही मंजुरी देण्यात आली.
- पाणीपुरवठा व मलप्रक्रिया केंद्रावर भर
महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पनवेल शहरातील पाणीपुरवठा योजनेची निगा व दुरुस्ती तीन वर्षांसाठी (2+1) करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. तसेच पनवेल शहर वगळता महापालिका क्षेत्रातील 29 गावांच्या पाणीपुरवठा योजनेची तीन वर्षांसाठी दैनंदिन देखभाल, निगा व दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली. कामोठे सेक्टर 32 येथील 85 एमएलडी क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्राचे परिचलन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी सिडकोने नियुक्त केलेल्या ठेकेदारास वाढीव मुदत देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. महापालिकेकडून नवीन ठेकेदाराची नियुक्ती होईपर्यंत ही व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. - स्वच्छता आणि धुरीकरण सेवांना मंजुरी
महापालिका क्षेत्रात यांत्रिकी पद्धतीने धुरीकरण व फवारणी सेवा पुरविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याशिवाय दैनंदिन रस्तेसफाई, नालेसफाई आणि इतर अनुषंगिक कामांसाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या कामाला मुदतवाढ देण्यासही समितीने मान्यता दिली. महापालिका हद्दीत विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. - सुरक्षा व विद्युत रोषणाईलाही हिरवा कंदील
पनवेल महानगरपालिका क्रिकेट अकॅडमी येथे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षा यंत्रणा बसविण्यास समितीने मान्यता दिली. तसेच महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी विद्युत उपकरणे व विद्युत व्यवस्था भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याच्या कामातील अंतिम देयकासाठी झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. महापालिकेतर्फे साजरे करण्यात येणारे जयंती उत्सव, सण व विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने इमारती, रस्ते, चौक आणि स्मारकांच्या ठिकाणी तीन वर्षांसाठी आकर्षक विद्युत रोषणाई भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याच्या कामाच्या न्यूनतम निविदेलाही मान्यता देण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर तसेच महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांवर दोन वर्षांच्या कालावधीसाठी माहिती दर्शक फलक बसविण्याच्या कामासंबंधीच्या प्रस्तावालाही स्थायी समितीने मंजुरी दिली.स्थायी समितीच्या या बैठकीत मंजूर झालेल्या विविध कामांमुळे पनवेल शहरासह महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा, स्वच्छता, मलनिःस्सारण आणि मूलभूत नागरी सुविधांना अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai