पनवेल महापालिकेत वर्धापन दिन उत्साहात साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 35
पनवेल मनपाने अधिकाधिक लोकाभिमुख कारभार करावा-महापौर नितीन पाटील
पनवेल : पनवेल महानगरपालिकेने अधिकाधिक लोकाभिमुख कारभार करून नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा आणि समाधान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महापौर नितीन पाटील यांनी केले. पनवेल महानगरपालिकेच्या वर्धापनदिन तथा दशकपूर्ती महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित स्नेहसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला 10 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत भव्य ‘दशकपूर्ती महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. दशकपूर्ती महोत्सावाचा प्रारंभ 1 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. महापौर नितीन पाटील यांनी महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पनवेल नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करून त्यांनी आमदारांचे आभार मानले. महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला ‘ही आपलीच महापालिका आहे’, अशी भावना निर्माण व्हावी आणि त्यांची कामे सुलभतेने मार्गी लागावीत, याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिकारी व पदाधिकारी यांच्यात सुसंवाद आणि समन्वय राहिल्यास कामांना गती मिळून त्याचा थेट लाभ नागरिकांना होईल, असेही त्यांनी सांगितले.आर्थिक सक्षमतेसोबत भविष्यातील आव्हानांवर भरआयुक्त मंगेश चितळे यांनी महापालिकेच्या विविध विभागांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या तसेच सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून भविष्यात ती अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेसमोर अनेक आव्हाने असून पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम केल्यास पनवेल महापालिका प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘गरजवंतांना तातडीने मदत मिळावी’
सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या कार्यकाळात महापालिकेच्या विकासकामांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा आणि गरजवंतांना महापालिकेच्या माध्यमातून तातडीने मदत मिळावी, या दृष्टिकोनातून सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पनवेल महापालिकेच्या कार्यपद्धतीची उदाहरणे इतर महापालिकांमध्ये दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश
वर्धापनदिनाचे औचित्य साधून महापालिकेअंतर्गत रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळालेल्या सुंदराबाई जाधव, केतन जाधव, गोविंद गायकवाड आणि रघुनाथ जाधव या चार लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 25 हजार रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना परिवहन उपायुक्त कैलास गावडे यांनी केली. आभार उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी मानले, तर सूत्रसंचालन मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी केले. यावेळी महापालिका सदस्य मनोज भुजबळ, दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, रुचिता लोंढे, प्रियंका कांडपिळे, डॉ. अस्मिता घरत यांच्यासह विविध विभागांचे उपायुक्त, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त महापालिका मुख्यालयासह चारही प्रभाग समिती कार्यालयांत येणाऱ्या अभ्यागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा, नगरसेवक तसेच अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आदी उपस्थित होते.
चारही प्रभाग समित्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पालिकेच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये (खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल) विशेष कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. प्रभाग समिती ड (पनवेल) येथे माजी सभागृह नेते तथा महापालिका सदस्य परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रभाग समिती क (कामोठे) च्या कार्यालयात सभापती रवींद्र जोशी आणि सदस्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम झाला. या वेळी सभापतींनी प्रभागात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन नागरिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दशकपूर्ती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
‘दशकपूर्ती महोत्सव’ ेनिमित्ताने विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दशकपूर्ती महोत्सावात प्रमुख 15 विशेष कार्यक्रम होणार आहेत यामध्ये मुख्य समारंभात राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या (माननीय मुख्यमंत्री महोदयांसह) उपस्थितीत महोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडेल. पनवेल मनपाच्या 10 वर्षांतील प्रवासावर दशकपूर्ती निमित्त विकास प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. याबरोबर महिला, युवा, विद्यार्थी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, प्रशासन, पत्रकार आणि गृहनिर्माण संस्था अशा 10 विविध घटकांसाठी 20 ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. तसेच महापौर चषक सेलिब्रिटी क्रिकेट स्पर्धा, महापौर करंडक राष्ट्रीय शाहिरी स्पर्धा, विशेष स्मरणिका महानगरपालिका गीत, मराठी नाट्य महोत्सव, रील्स स्पर्धा आयोजित केली जाईल.तसेच दशकपूर्ती व्याख्यानमाला, नशामुक्ती वॉकेथॉन, आपुलकी मेळावा, विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव आणि पारितोषिक वितरणाने महोत्सवाने कार्यक्रमाची सांगता होईल. यावेळी आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले की, महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक समाजघटकाला या दशकपूर्ती निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केले जाईल. त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. दशकपूर्तीच्या निमित्ताने जे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे,त्यामध्ये मनपाचा इतिहास, सुरुवातीची परिस्थिती, आताची परिस्थिती तसेच पुढे झेप घेताना महापालिकेच्या पुढची आव्हाने, याची माहिती असणार आहे.या दशकपूर्ती कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai