बेकायदा हुक्का पार्लरवर छापा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2026
- 38
नवी मुंबई : वाशीतील मॅफ्को रोडवरील हॉटेलच्या टेरेसवर पहाटेपर्यंत सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर एपीएमसी पोलिसांनी बुधवारी (7 ऑक्टोबर) पहाटे छापा टाकला. कारवाईच्या वेळी तेथे सात ते आठ तरुण-तरुणी हुक्का ओढत असल्याचे आढळून आले. हुक्क्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि विविध फ्लेवरचे डबे जप्त करण्यात आले असून, पार्लर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी सेक्टर 19ए येथील मॅफ्को रोडवरील ‘ब्लिस कॅफे, सिझार इन हॉटेल’च्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर हा प्रकार सुरू होता. या ठिकाणी हुक्क्यामध्ये निकोटिन व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर केला जात असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील यांच्या पथकाने बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये पोहोचले असता टेरेसवरील हुक्का पार्लरमध्ये सात ते आठ तरुण-तरुणी हुक्का ओढत असल्याचे दिसून आले. परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचा धूर पसरलेला होता. ग्राहकांना निकोटिनच्या सेवनाबाबत कोणतीही जनजागृतीपर सूचना किंवा इशारा देणारे फलकही तेथे लावण्यात आले नव्हते. हुक्का पार्लर सुरू करण्यासंदर्भातील नियमांचे पालन होत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी चार पारदर्शक काचेचे हुक्का पॉट, प्लास्टिकच्या नळ्या तसेच विविध फ्लेवरचे डबे असा सुमारे सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मो. उस्मान सगीर खान याच्याविरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण विनियमन) अधिनियम, 2003 (सुधारित 2018) मधील कलम 4(क) आणि 21(क) तसेच मुंबई पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 33(डब्ल्यू) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गोविंद एस. कुटे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या कारवाईमुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः हॉटेलच्या टेरेसवर अशा प्रकारे ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून दिला जात असताना संबंधित यंत्रणांचे त्याकडे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai