लज्जतदार पोपटी
- by मोना माळी-सणस
- Mar 21, 2020
- 1953
रायगड जिल्ह्यातील खाद्य संस्कृतीमधील एक फार जुना; पण आता नव्याने प्रकाशझोतात येणारा पदार्थ म्हणजे पोपटी. पोपटी या नावावरूनच नैसर्गिक साधनांपासून बनणार हिरवागार चविष्ठ पदार्थ असे आकलन आपसुकच मनाला स्पर्श करते. काळोखी रात्र, अंगाला झोंबणारा गार वारा, पक्षांचा किररर.. किररर आवाज आणि माळरानावर पेटणारी शेकोटी... हे दृश्य सध्या पनवेलपासून पुढे संपूर्ण रायगडात पोपटी पार्ट्यांच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
जानेवारी ते मार्च या काळात जिल्ह्यात वालाचे, चवळीचे पीक जोमाने उभे राहते. त्यामुळे वालाच्या शेंगांना मोठी मागणी या काळात असते. याच दरम्यान पोपटीचा हंगाम सुरु होतो आणि जिल्ह्यासह इतर खवय्यांची पावले रायगडच्या ग्रामीण भागाकडे वळतात.
खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र असणार्या पोपटीचे मोठ्या दिमाखात आयोजन केले जाते. कुंटुंब, मित्रपरिवार, आप्तजणांसह पोपटीच्या मेजवानीचा आस्वाद घेतला जातो.
जिल्ह्यातील तळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाल-चवळीचे उत्पादन घेतले जाते. यंदा चांगले पीक आल्याने वीकेण्डला आलेल्या शिमगोत्वाच्या मुहूर्तावर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोपटी पार्ट्या रंगल्या. तसेच तालुक्यातील मालाठे-गिरणे-नानवली गावातील खाडीपट्ट्यातील वाल फार चविष्ठ असल्याने येथील शेंगांच्या पोपटीला तोडच नाही..
पोपटी शिजण्यासाठी कमीत कमी अर्धा तासांचा कालावधी लागतो. या वेळात रंगते ती म्हणजे मैफल.. नाच, गाणे, नकला, गप्पा, गोष्टी आणि जुन्या आठवणी.. आ..हा..हा... विशेष म्हणजे, बोचर्या थंडीत पोपटीच्या शेकोटीने शेकत शेकत जी काही तालीम रंगते त्याने पोपटीची चव आणखीनच लज्जतदार होते यात शंका नाही. हिवाळ्यात ग्रामीम भागात जेव्हा हिरवळ पसरते, म्हणजेच परिसर पोपटी रंगाचा होतो, तेव्हाच पोपटीचे बेत आखले जातात. बिनतेलाचा, पाण्याशिवाय, पूर्णपणे नैसर्गिक पदार्थांपासून बनणारा चविष्ट, खमंग, लज्जतदार पदार्थ म्हणजेच पोपटी. शाकाहारी आणि मासांहार अशा दोनही खवय्यांना चाखता येणार पदार्थ म्हणजे पोपटी. विशेष म्हणजे, यात वापरणारा पाला हा वेगळेच चव देऊन जातो. पाऊस संपून हिवाळ्यात जेव्हा जमीन सुकायला लागते, तेव्हा दवांच्या पाझरावर काही वनस्पती तग धरून उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील एक म्हणजे भांबुर्डा. ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपूर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. या वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.
साहित्य
वालाच्या ताज्या शेंगा दोन किलो, एक किलो चिकन (मोठे तुकडे), एक डझन अंडी, बटाटे अर्धा किलो, अर्धा किलो कांदे-वांगी (आवडीनुसार), सारणासाठी मसाला (कांदे-बटाट्यांमध्ये घालण्यासाठी खवलेलं खोबरं, तिखट, मीठ व गोडा मसाला), जाडे मीठ, चवीपुरता ओवा आणि मध्यम आकाराचं मातीचं मडकं, भांबुर्डीचा पाला, जळणासाठी पेंड किंवा पाळापाचोळा
कृती
मातीचे जुने मडके स्वच्छ धुऊन घ्यावे. त्याच्या तळाशी भांबुर्डीचा पाला टाकावा. त्यावर ताज्या शेंगा, थोडं चिकन, अंडी, अर्धे कांदे-बटाटे आणि वांगी ठेवावीत. वरुन थोडासा ओवा व मीठ पेरावे. पुन्हा भांबुर्डीचा पाला व उरलेल्या जिन्नसाचा असाच एक थर लावावा. त्यानंतर मडक्याचं तोंड पाल्यानं घट्टा बंद करुन ते मडकं अग्नीवर उलटे ठेवावे. मडक्याभोवती जाळ व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी.
जाळ जास्त असल्यास अर्धा तास, अन्यथा पाऊणतास हे मिश्रण शिजवावं. चोहीबाजूनं लागणार्या जाळामुळं भांबुर्डीसह इतर जिन्नसांचा स्वाद परस्परांत एकरूप होऊन एका भन्नाट चवीची निर्मिती होते. अर्धा-पाऊणतासाने मडक्यावर पाणी मारून पाहावं. ‘चर्र’ असा आवाज झाल्यास पोपटी शिजली समजा. नंतर मडके अलगद बाहेर काढून त्यातील भांबुर्डीचा पाला बाजूला काढून बाकी सर्व जिन्नस खाण्याची मज्जा काही औरच असते.
मोना माळी-सणस
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस