परदेशातून आलेल्यांना सरकार आता घरापर्यंत सोडणार

मुंबई : कोरोना वेगाने फैलावत असतानाही काही नागरिक या समस्येला तितकेसे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आलेले नागरिकही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता यापुढे परदेशातून येणार्‍या नागरिकांना विमानतळापासून घरी सोडण्याची व्यवस्था सरकारकडूनच करण्यात येणार आहे. अर्थात यासाठीचे पैसे संबंधित प्रवाशांनाच भरावे लागणार आहेत. 

राज्य सरकारच्या या निर्णयानुसार विमानतळापासून 300 किलोमीटरच्या अंतरापर्यंत जास्त प्रवासी राहत असतील तर त्यांच्यासाठी बसची सोय करण्यात येईल. मात्र, प्रवाशांची संख्या कमी असेल किंवा एखाद्याचे घर 300 किमीपेक्षा जास्त अंतरावर असेल तर अशा प्रवाशांसाठी टॅक्सीची सोय करण्यात येईल. या सगळ्याचे पैसे संबंधित प्रवाशांनाच चुकते करावे लागणार आहेत. यासाठी सरकारकडून उपनगर जिल्हाधिकार्‍यांना 15 ते 25 नॉन एसी बसेस आणि 20 ते 25 टॅक्सी सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

शुक्रवारी राज्यात कोरोनाचे चार नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबईतील दोन आणि पुणे व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर जाऊन पोहोचला आहे.

मुंबई येथे आज आढळून आलेल्या दोन रुग्णांमध्ये एका 38 वर्षीय तरुणाने तुर्कस्तान येथे प्रवास केला असून 62 वर्षीय व्यक्ती (पुरुष) इंग्लंडवरुन परतला होता. तर पुण्यातील 20 वर्षीय तरुणाने स्कॉटलंड येथून प्रवास केलेला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील फिलीपाईन्स आणि सिंगापूर येथे जाऊन आला होता. जो 22 वर्षीय तरुण दोन दिवसांपूर्वी करोना बाधित आढळला त्याचा 24 वर्षाचा भाऊ करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.