दोन हजार बेस्ट रस्त्यांवर

मुंबई : रविवारी संपूर्ण देशात जनता संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला. काल जनतेने एक दिवस जनता कर्फ्यू पाळला पण आज त्याउलट अनेक जण रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. सरकारने देशातील रेल्वेसेवा, लोकल सेवा, बससेवा बंद केली आहे. मात्र असं असतानाही आज बेस्टने सुमारे दोन हजार गाड्या मुंबईच्या रस्त्यांवर उतरवल्या आहेत. बेस्टच्या आज सकाळी दहा वाजेपर्यंत 1938 बस रस्त्यावर होत्या.

मुंबईत सध्या लोकलसेवा बंद केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच टक्के अत्यावश्यक सोयी पुरवणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी बेस्ट बस बंद केल्या नाहीत. या गाड्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसोबतच शेअर बाजारात नोकरीला असणारे कर्मचारी, हॉस्पिटलला जाणारे रुग्ण यांना प्रवेश देण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठी बेस्टचे दरवाजे बंदच ठेवले. मात्र, केवळ पाच टक्के शासकीय कर्मचार्‍यांसाठी बेस्टने 50 टक्के बसेस रस्त्यावर उतरवल्या. 

एवढी गरज नसताना नियोजनाअभावी अतिरिक्त बसेस रस्त्यावर उतरवल्या गेल्या आहेत. एकूण सव्वा तीन हजार बसपैकी दोन हजार बस रस्त्यावर उतरल्या असल्याची माहित आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना, प्रवास करण्यास मुभा दिली असताना बेस्ट बसेसची रस्त्यावर गर्दी आहे. गरज नसतानाही बेस्टच्या दोन हजार बसेस रस्त्यावर का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.