बंदराच्या विस्तार आराखड्यासह विकासकामांचा आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 19
वाढवण बंदर प्रकल्पासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राचा सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकास साधण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उरण येथील जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाच्या मुख्य प्रशासकीय भवनाला भेट देऊन बंदरातील विविध विकासकामांचा तसेच भविष्यातील विस्तार आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाळ, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, जेएनपीएच्या सचिव तथा महाव्यवस्थापक मनीषा जाधव तसेच जेएनपीए आणि महाराष्ट्र सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जेएनपीएची विद्यमान बंदर क्षमता, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, आधुनिक पायाभूत सुविधा, कंटेनर हाताळणी क्षमता वाढविण्यासाठी सुरू असलेली कामे तसेच पर्यावरणपूरक व्यवस्थापनाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा मंत्री राणे यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच, जेएनपीएमार्फत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून पालघर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याचाही मंत्री राणे यांनी सविस्तर आढावा घेतला. राज्यातील बंदरांची क्षमता वाढविणे, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे, मल्टीमोडल लॉजिस्टिक नेटवर्क अधिक सक्षम करणे तसेच महाराष्ट्राला जागतिक सागरी व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या सागरी विकासाला अधिक गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून विविध विकास प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला. तसेच, बंदर क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कौशल्य विकासाला चालना आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उभारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai