‘पोस्ट कोरोना’ केंद्र देणार दिलासा

नवी मुंबई ः कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांमध्ये काही पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. अशा रुग्णांना मार्गदर्शन करुन त्यांना दिलासा देण्यासाठी पालिकेने पोस्ट करोना केंद्र सुरू करण्याची मागणी  शिवसेना सीवूड पश्‍चिम विभाग प्रमुख, परिवहन समिती सदस्य समीर बागवान यांनी पालिका आयुक्तांकडे केली. आयुक्तांनीदेखील या केंद्राची गरज असल्याचे सांगत ऐरोली आणि नेरूळमध्ये असे केंद्र सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

जगभर थैमान घाललेल्या कोरोनाच्या विषाणूने नवी मुंबईही चांगलेच हातपाय पसरले आहेत. दररोज सरासरी चारशेहून अधिक नव्या रुग्णांची शहरात नोंद होत आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षमपणे प्रयत्न करत आहे. या आजारातून बर्‍या होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढत आहे. मात्र, बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांना होत असलेला त्रासही मानसिक तणाव वाढवणारा आहे. या व्यक्तींमध्ये श्‍वास घेण्यास त्रास होणे, चालताना-बोलताना दम लागणे, अत्यंत थकवा जाणवणे, अंग दुखणे, डोकेदुखी अशी लक्षणे आढळत आहेत. आधीच करोनामुळे धास्तावलेल्या रुग्णांसाठी ही उत्तर लक्षणे चिंता वाढवणारी ठरतात. अशा रुग्णांना मार्गदर्शन किंवा त्यांच्यावर उपचार करण्याची कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नवी मुंबईत उपलब्ध नाही. शिवाय या रुग्णांवर उपचार करण्यास खासगी डॉक्टर वा रुग्णालयेही नकार देतात. मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांत अशा रुग्णांवरील उपचारांकरिता तसेच त्यांच्या मार्गदर्शनाकरिता पोस्ट करोना ओपीडी अथवा पोस्ट करोना केंद्र तयार करण्यात आले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांना मार्गदर्शन केले जाते. त्यांची नियमित तपासणी होते व त्यांच्या प्रकृतीचा मागोवाही घेण्यात येतो. त्यामुळे रुग्ण पूर्णपणे बरा आणि आजारमुक्त होत आहेत. नवी मुंबई महापालिकेनेही अशा प्रकारच्या केंद्रांची निर्मिती करण्याची गरज जाणवत आहे.

नेरूळमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पोस्ट करोना केंद्र सुरू करण्यास आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे. यावेळी सुरुवातीस नेरूळमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पोस्ट करोना केंद्र सुरू करून तेथे रुग्णांना येण्याचे आवाहन करू, असे आयुक्तांनी सांगितले. त्यावर बागवान यांनी, पालिकेकडे असलेल्या रुग्णांच्या माहितीचा वापर करत पालिकेनेच रुग्णांशी संपर्क करून त्यांची पोस्ट करोना तपासणी करत आवश्यक औषधोपचार करावे, अशी मागणी करण्यात आली.