गणेश नाईकांना सुरक्षा द्या

धमकी देणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

नवी मुंबई ः नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक यांना धमकी देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई प्रभारी प्रशांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी महापौर जयवंत सुतार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकार्‍यांनी बुधवारी पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांना भेटून तक्रार अर्जाद्वारे केली. तसेच नाईकांच्या सुरक्षितेत वाढ करण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

दिघा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍यांच्या कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कार्यकर्त्यांकडून तलवार भेट देण्यात आली. भेट दिलेली तलवार ते परजत असताना ही तलवार गणेश नाईक यांच्यासाठी का, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी काढले. त्यावर उपस्थितांनी होकारार्थी साथ दिली. सध्या या घटनेची दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यक्रमातील उपस्थितांनी उघडपणे तलवार परजत आमदार गणेश नाईक यांना धमकावण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप नाईक समर्थकांकडून होत आहे. या घटनेनंतर माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच आमदार गणेश नाईक यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही मागणी केली आहे. या प्रकरणावरून आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अधिक जुंपणाची चिन्हे दिसत आहेत.