कृषी विधेयकांवरुन देशव्यापी आंदोलन

देशभरात शेतकरी संघटना आक्रमक 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशातील जवळपास 30 हून अधिक शेतकरी संघटना या विधेयकांच्या विरोधात आज रस्त्यावर उतरल्या आहेत. या विधेयकाविरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज शुक्रवारी ‘भारत बंद’चा नारा दिला आहे. 

विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटकमध्ये झालेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही सक्रिय पाठिंबा दिला आहे. काँग्रेचे खासदार राहुल गांधी यांनीही या देशव्यापी आंदोलनाला समर्थन दिलं आहे. पंजाब आणि हरियाणातून सर्वाधिक विरोध होत आहे. शेतकरी संघटनांसोबत काही राजकीय पक्ष देखील कृषी विधेयकांविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शेतकरी रस्त्यांवर उतरुन चक्काजाम आणि रेल्वे मार्गावर निदर्शने करणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पंजाब- हरियाणातून जाणार्‍या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पंजाबमध्ये शेतकर्‍यांना गुरुवारी रेल रोको आंदोलन केले. शुक्रवारी ते राज्यातील विविध भागात रेल्वे मार्गावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात किसान मजदूर समिती आणि भारतीय किसान युनियनशी संबंधित शेतकरी सहभागी झाले आहेत. हरियाणात सर्व महामार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शेतकरी नेत्यांच्या माहितीनुसार आज राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे रोको करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. भारतीय किसान यूनियन या संघटनेनं या आंदोलनाला शेतकरी कर्फ्यू असं नाव दिलं आहे. महाराष्ट्रात देखील या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. राज्यातील शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या कृषी विधेयकाची होळी आपल्या शिरोळ येथील निवासस्थानी केली.