डीवाय पाटील, एमजीएम हॉस्पिटलचे करार संपुष्टात

नगरविका विभागाच्या आदेशानुसार पनवेल महापालिकेचे रुग्णालय प्रशानाला पत्र

पनवेल ः कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पनवेल महापालिकेने नेरूळ येथील डी. वाय. पाटील आणि कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलशी केलेले आरोग्यविषयक करार संपुष्टात आल्याची घोषणा करत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाला लेखी कळविले आहे. 

मार्चमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात कोविडने शिरकाव केला आणि एप्रिल, मे महिन्यात फैलाव वाढला. राज्य शासनाने महापालिका स्तरावर उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार 11 मे रोजी कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल आणि 15 जुलैला नेरूळ, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलसोबत पनवेल महापालिकेने सामंजस्य करार केला. त्यामध्ये डॉक्टर खर्च, औषधोपचार, रुग्णांना जेवण आणि इतर बाबींचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार एमजीएम हॉस्पिटलला दीड कोट्यवधी रुपयांची देयके देण्यात आली होती. राज्यातील कोविड रुग्णांना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना लागू असताना महापालिका प्रशासन जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा वेगळ्या पध्दतीने का करत आहे, असा प्रश्‍न काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला होता. तसेच ती योजना दोन्ही हॉस्पिटलला लागू करावी, अशा आशयाच्या मागणीसह तक्रार नगरविकास विभागाकडे केली होती.

त्या अनुषंगाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत विविध रुग्णालय संलग्न असून कोणत्याही महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयाशी वेगळयाने करार करण्याची आवश्यकता नाही. तसेच अशा प्रकारच्या करारामध्ये रुग्णालयाच्या देखभालीचा तत्सम खर्च आकारला जात असतो. त्यामुळे रुग्णांवर होणार्‍या खर्चाची द्विरुक्ती होते. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने एम.जी.एम. रुग्णालय, कामोठे व डी.वाय. पाटील रुग्णालय, नवी मुंबई यांच्यासोबत केलेला करार रद्द करावा, असे पत्र नगरविकास विभागाने पनवेेल महापालिकेला दिले होते.  या पत्राच्या आधारे आयुक्त देशमुख यांनी 16 ऑक्टोबरला दोन्ही हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी, राज्य आरोग्य योजनेचे प्रतिनिधी, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक घेवून करार संपुष्टात आल्याची घोषणा केली. तसेच दोन्ही रुग्णालय प्रशासनाला लेखी पत्र देवून करार संपुष्टात आल्यानंतर महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांवर हॉस्पिटल प्रशासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून विना तक्रार उपचार करतील, अशी विनंती केली आहे.