सिडकोमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

नवी मुंबई ः केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार दरवर्षीप्रमाणे सिडको महामंडळामध्ये 27 ऑक्टोबर 2020 ते 02 नोव्हेंबर 2020 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. सिडकोच्या सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयासह सिडकोची नोडल कार्यालये, नवीन शहर कार्यालये येथे हा सप्ताह साजरा करण्यात आला. यावर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची ‘सतर्क भारत, समृद्ध भारत’ ही संकल्पना होती. 

केंद्रीय दक्षता आयोगातर्फे भ्रष्टाचारविरोधी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. आयोगाच्या निर्देशांनुसार सिडकोच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सत्यनिष्ठेची शपथ घेतली. सप्ताहाच्या कालावधीत भ्रष्टाचारविरोधी जनजागृती व दक्षता या विषयावर आधारित भित्तीफलक (बॅनर) सिडकोच्या सर्व कार्यालयांच्या दर्शनी भागात तसेच ऐरोली ते पनवेल दरम्यानच्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर लावण्यात आले. महामंडळातील निवडक अधिकार्‍यांकरिता ’दक्षता जागरूकता’ या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती.

केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शनानुसार देशभरातील शासकीय व निमशासकीय संस्था आणि कार्यालयांमध्येही या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी; समाजाच्या अशा विविध स्तरांतील घटकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जागृती निर्माण होऊन भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे, या उद्देशाने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.