यंदा दिवाळी फराळ महागला

पनवेल : दिवाळी म्हटले की फराळ आलाच. रितीरिवाजासाठी घरात थोडा फराळ केला जात असला तरी रेडिमेड फराळाला विशेष मागणी असते. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने रेडिमेड फराळ खरेदीकडे सुमारे 40 टक्के ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. तसेच दिवाळी फराळासाठी लागणार्‍या कच्या मालाच्या किमंतीही 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे रेडिमेड फराळच्या किमतीतही 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच फराळ घरी केला तरी तो दरवर्षीच्या तुलनेत महागच पडणार आहे. 

दिवाळी म्हटले की फराळ आणि फटाके हे समीकरणच झाले आहे. बाजारात रेडिमेड फराळ विक्रीसाठी ठेवले जातात. हल्लीच्या धक्कधकीच्या जिवनात नोकरी, व्यवसायानिमित्त ज्यांना फराळ बनवले शक्य नसते त्यांच्याकडून या तयार  फराळाला विशेष मागणी असते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा अनेकांनी या तयार फराळ खरेदीकडे पाठ फिरवली आहे. कोरोनाची भीती, त्यात बाहेरील तेलकट पदार्थ नको, अशी भूमिका काहींनी घेतल्याने फराळ विक्री करणारे बचत गट, दुकानदार या वर्षी आर्थिक संकटात आहेत. कोरोनामुळे फराळ खाणारे खवय्येही गतवर्षीपेक्षा या वर्षी काही प्रमाणात जपूनच अशी भूमिका घेताना दिसून येत आहे. कोरोनामुळे नागरिक कोणत्याही वस्तू अथवा पदार्थ खरेदी करताना खूप विचार करताना दिसून येत आहेत. तेलकट पदार्थ खाऊ नयेत, अशी अनेकांची धारणा कोरोनामुळे झाल्यानेच, कोरोनाच्या भीतीमुळे तयार फराळाच्या विक्रीत यावेळी मोठी घट झालेली दिसून येत आहे. तसेच घरी फराळ करणार्‍या गृहीणींनाही यावर्षीचा फराळासाठी बजेट बसविताना काटकसर करावी लागणार आहे. कारण फराळासाठी लागणार्‍या विविध वस्तूंच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

लॉकडाऊनमध्ये महागाई काही प्रमाणात वाढली आहे. विशेष मध्यंतरी अनेक दुकानांमध्ये सामानाचा तुटवडा भासत असल्याने, या फराळासाठी लागणारे साहित्य (कच्चा माल) किंमत वाढल्याने त्याचाच परिणाम फराळाच्या किमतींवर पाहावयास मिळत आहे. म्हणून सर्व फराळांच्या किमती 100 ते दिडशे रूपयांनी वाढल्या आहेत. मागणीत सुमारे 40 टक्के घट झाली आहे. तेलकट पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. मात्र, साजुक तुपापासून बनलेल्या बेसनच्या लाडवासारख्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वस्तू किंमत
शेंगदाणे 90- 100 
तुरडाळ 100 
मुगडाळ 100
हरभरा डाळ 66-74
मैदा 28-30
खोबरे 160
रवा 28-30
साखर 34-36
भाजके पोहे 60