105 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा पालिकेच्या सेवेत समावेश

पनवेल : पनवेल महापालिकेत काम करणार्‍या तत्कालीन ग्रामपंचायतींच्या 105 कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे. नगरविकास खात्याकडून या प्रश्नासंदर्भातील जीआर काढण्यात आला असून पहिल्या टप्प्यात 105 कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित कर्मचार्‍यांचा पुढील टप्प्यात समावेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

01 ऑक्टोबर 2016 रोजी पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी महापालिकेत समावेश व्हावा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केले होते. महापालिकेच्या या समावेशन प्रकियेला जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली. कर्मचारी समावेशनासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. मोठ्या विलंबानंतर कोकण आयुक्तांनी नगरविकास विभागाला हा अहवाल 25 जानेवारी 2019 रोजी दिला. अहवाल सरकारला सादर करूनही त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचार्‍यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर पहिल्या टप्प्यात 105 कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे.