नवी मुंबईत मनसेचा ‘झटका’ यशस्वी

नवी मुंबई ः वाढीव वीज बिलांविरोधातील सर्वसामान्य जनतेचा आक्रोश शासन दरबारी पोहोचविण्यासाठी मनसेने राज्यभरात 26 नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्‍वभुमीवर नवी मुंबई मनसेच्यावतीने कोकण भवन येथे झटका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वीज देयकांत सवलत मिळाली नाही तर पुढचे आंदोलन मंत्रालयात करू असा इशारा देण्यात आला.

वाढीव वीज बिलांविरोधात मनसेने आक्रमक भुमिका घेतली आहे. कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना वीज मंडळाने पाठवलेली हजारो रूपयांची बिलं कमी करण्यात यावी यासाठी मनसेकडून आज आंदोलन हाती घेण्यात आली आहे. नवी मुंबईतील मनसेकडून सिबीडी येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने अनेक वेळा आश्‍वासन देऊनही वीज बिलात कोणत्याही प्रकारची सूट मात्र अद्याप दिलेली नाही. कोरोना काळात आधीच लोकांच्या नोकर्‍या गेल्या असताना पाठवण्यात आलेली हजारो रूपयांची बिलं भरायची कशी, असा प्रश्‍न गोरगरिबांना पडला आहे. त्यामुळे सरकारने त्वरित वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने दिलेला शॉक असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

या वेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहर अध्यक्ष नीलेश बाणखिले, विनोद पार्टे, प्रसाद घोरपडे, बाळासाहेब शिंदे , महिला शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उप शहर अध्यक्ष अनिता नायडू आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाचे रूपांतर कोकण येथे सभेत झाले. या वेळी अनेकांनी भाषणे केली. वीज देयकांत सवलत मिळाली नाही तर पुढचे आंदोलन मंत्रालयात किंवा मंत्र्यांच्या घरी करू असा इशारा देण्यात आला.