ऑनकॉलवरील आठ डॉक्टर गैरहजर

कारणे दाखवा नोटीसा; चौकशीचे आदेश

नवी मुंबई : वाशी येथील महापालिका सार्वजनिक रुग्णालयास पालिका आयुक्तांनी मंगळवारी अचानक भेट दिली. यात पालिका सेवेत ऑनकॉलवर असलेले आठ आरोग्य अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

वाशीचे प्रथम संदर्भ रुग्णालय करोनासाठी राखीव ठेवले होते. नुकतेच हे रुग्णालय सार्वजनिक करण्यात आले आहे. येथील कामकाज पाहण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी रुग्णालयाला अचानक भेट देत केली. यात हजेरीपत्रक तपासताना ऑनकॉल वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याबाबत खुलासा घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे. हजेरी पत्रकात त्यांच्या यापूर्वीच्या काळातील उपस्थितीची स्वाक्षरी नसल्याचे आढळून आल्याने याबाबत चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. हे डॉक्टर ऑनकाल सेवेत असली तरी त्यांनी सेवाकाळात उपस्थित असणे बंधनकारक असते. पूर्वीच्या तुलनेत सध्या रुग्णालयातील रुग्णसंख्या कमी होती. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना त्यांनी हे रुग्णालय परत इतर रुग्णांसाठी सुरू झाल्याचे नागरिकांपर्यंत पोहचवा अशा सूचना दिल्या. शस्त्रक्रियेची संख्या वाढविण्याबाबतही सांगण्यात आले. येथील शौचालयांच्या स्वच्छतेबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.