Breaking News
सेफ कस्टडीतून 45 कोटींचे 103 किलो सोने गायब
चेन्नई : सीबीआयने तामिळनाडूत एका ठिकाणी केलेल्या छापेमारीत जप्त केलेल्या सोन्यापैकी 45 कोटी रुपये किंमतीचे 103 किलो सोनं गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे सोनं सीबीआयच्या सेफ कस्टडीत ठेवण्यात आले होते. या प्रकरणात आता मद्रास उच्च न्यायालयाने सीबी-सीआयडी तपासाचे आदेश दिले आहेत.
सीबीआयने 2012 मध्ये तामिळनाडूतल्या सुराणा कॉर्पोरेशनवर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये सीबीआयनं तब्बल 400 किलो सोनं जप्त केलं होतं. तेव्हापासून हे सोनं सीबीआयच्या ताब्यात होतं. मात्र, आता या सोन्याचं पुन्हा एकदा वजन करण्यात आलं. या वजनात तब्बल 103 किलो सोनं कमी भरलं गेले. त्यानंतर या सर्व प्रकार समोर आला. सीबीआयच्या ताब्यातील सोनं गायब झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. यानंतर आता कोर्टानं चक्क सीबीआयच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र देशातील सर्वोच्च यंत्रणेची चौकशी कोण करणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर ही चौकशी आता चक्क सीबी-सीआयडी म्हणजेच राज्य सरकारचा गुन्हे अन्वेशन विभाग करणार आहे. सीबीआयनं या चौकशीला विरोध केला आहे. मात्र कोर्टानं कडक शब्दात फटकारले आहे. तसेच ही चौकशी एसपी दर्जाच्या अधिकार्याच्या अखत्यारित सीआयडीद्वारे केली जाईल, असं सांगितलं आहे. विशेष म्हणजे ही चौकशी 6 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
या मुद्द्यावर सीबीआनं न्यायालयाला सांगिंतलं की त्यांनी सेफ आणि वॉल्ट्सच्या 72 चाव्या चेन्नईच्या प्रिन्सिपल स्पेशल कोर्टाकडं जमा केल्या होत्या. सीबीआयनं असाही दावा केला आहे की जप्त केलेल्या सोन्याचं वजन एकत्रितरित्या करण्यात आलं होतं. परंतु एसबीआय आणि सुराना कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील कर्ज प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या लिक्विडेटरकडं सोनं देताना त्याचं वेगळं-वेगळं वजन करण्यात आलं होतं. सीबीआयची चौकशी होण्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना असेल. मात्र या घटनेमुळे देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हं उपस्थित झालं आहे. आता चौकशीत काय समोर येतं? यातून या प्रकरणाचा उलगडा कसा होतो? आणि खरा गुन्हेगार कोण? या सर्व प्रकरणाची उत्तरे लवकरच समोर येतील.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai