सिडकोतर्फे 6 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध

खारघर, कळंबोली आणि सानपाडा नोडमध्ये निवासी आणि वाणिज्यिक भूखंड

नवी मुंबई ः सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि सानपाडा नोडमधील निवासी आणि वाणिज्यिक (आर+सी) वापराचे 6 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक नोडमधील 2 याप्रमाणे 6 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध आहेत. 

खारघर हा नवी मुंबईतील सर्वांत मोठा नोड असून रेल्वे, रस्ते आणि प्रस्तावित मेट्रो स्थानक यांद्वारे सदर नोडला उत्तम परिवहन जोडणी लाभाली आहे. सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले कॉर्पोरेट पार्क, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महागृहनिर्माण योजना यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प खारघरमध्ये आणि नजीकच्या परिसरात आकारास येत आहेत. कळंबोली येथील घाऊक लोह आणि पोलाद बाजार, वखार संकुल (वेअरहाउसिंग कॉम्प्लेक्स) यांमुळे हा नोड वाणिज्यिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. तर वाशी नोडलगत असणारा सानपाडा हाही परिवहन, उद्योग इ. सोयी सुविधांनी परिपूर्ण नोड आहे. 

सिडकोच्या सदर योजनेमुळे बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईसारख्या सर्व भौतिक आणि सामाजिक पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या शहरात भूखंड घेऊन तो आपल्या मनाप्रमाणे विकसित करण्याची उत्तम संधी प्राप्त झाली आहे. तसेच कोविड-19 व तद्अनुषंगिक टाळेबंदीमुळे मंदीचा सामना कराव्या लागणार्‍या बांधकाम क्षेत्राला बळकटी देण्यासाठीही ही योजना उपयुक्त ठरणार आहे.