कामाला लागा आणि जोरदार तयारी करा

शर्मिला ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वपक्षीय कामाला लागले आहेत. कार्यकर्ता मेळावे, बैठका, सभा यातून सर्वांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर 25 जानेवारी रोजी एपीएमसी फळ मार्केटमध्ये शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते वाहतूक सेनेचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले आहे.

कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या शर्मिला ठाकरे यांचं मार्केटमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी मार्केटमध्ये असणार्‍या व्यापार्‍यांशी संवाद साधला. तसेच मार्केटमध्ये कोरोना काळात काम करणारे सफाई कर्मचारी, व्यापारी, सुरक्षा रक्षक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शर्मिला यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आता महापालिका निवडणूक येणार आहे त्यासाठी कामाला लागा आणि जोरदार तयारी करा, असं आवाहन शर्मिला ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

मुंबई एपीएमसी भाजीपाला आणि फळ मार्केटला काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भेट दिली होती. त्यानंतर मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी एपीएमसी मार्केटला भेट दिली. त्यांनी मार्केटच्या सर्व घटकांकडून चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित्या या नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखाली राहिल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीमधील मोठा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत या वर्गाला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी मनसेने आता एपीएमसी मार्केटमध्ये नारळ फोडले आहे.