शासकीय जमिनीचा बिवलकरांकडून सौदा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 18
राखीव वनजमीन परस्पर विकल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
नवी मुंबई : शासनाच्या मालकीची आणि राखीव वन म्हणून नोंद असलेली जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवून परस्पर विक्री केल्याप्रकरणी बिवलकर कुटुंबीयांविरोधात रसायनी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. पनवेल तालुक्यातील आपटे येथील 1.30 हेक्टर शासकीय वनजमिनीची विक्री केल्याचा आरोप असून, सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब जवरे यांच्या तक्रारीवरून गंगाधर बिवलकर आणि यशवंत बिवलकर यांच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
मौजे आपटे, ता. पनवेल, जि. रायगड येथील सर्व्हे क्रमांक 41 मधील 4.35 एकर जमीन नारायण विनायक बिवलकर यांनी 1959 मध्ये वनविभागाकडे 90 वर्षांच्या कराराने व्यवस्थापनासाठी दिली होती. याबाबत भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 38 अन्वये 21 ऑक्टोबर 1959 रोजी अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, 30 ऑगस्ट 1975 रोजी महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियम लागू झाला. या कायद्यानुसार संबंधित खाजगी वनजमिनी राज्य शासनाकडे निहित झाल्या आणि त्यांना राखीव वनाचा दर्जा मिळाला. त्यामुळे मूळ मालकांसह अन्य कोणाचेही हक्क आणि हितसंबंध या जमिनीवर शिल्लक राहिले नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.
वन विभागाच्या अभिलेखानुसार आपटे येथील सर्व्हे क्रमांक 41-ब मधील 1.30 हेक्टर क्षेत्र शासनाच्या मालकीचे आणि राखीव वनक्षेत्र आहे. मात्र, ही बाब लपवून गंगाधर बिवलकर आणि यशवंत बिवलकर यांनी सदर जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे भासविल्याचा आरोप आहे. त्यानंतर 31 डिसेंबर 2009 रोजी नोंदणीकृत खरेदीखत क्रमांक 9502/2009 द्वारे मुंबईतील सुरेश टेकचंद कलानी आणि इंद्रपाल व्ही. पपनेजा यांना ही जमीन 15 लाख 7 हजार रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले आहे.
- पडताळणीत गैरव्यवहार उघड
जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, ही जमीन बिवलकर कुटुंबीयांना शासनाकडून पुन्हा हस्तांतरित करण्यात आल्याचा पुरावा आढळला नाही. जमीन कायदेशीररीत्या शासनाच्याच ताब्यात असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक जवरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. वन जमिनीची मालकी स्वतःकडे असल्याचे भासवून तिची विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप झाल्यानंतर वन विभागाने रसायनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बिवलकर बंधूंविरोधात गुन्हा नोंदवला. - वनजमिनीच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह
आपटे येथील या प्रकरणामुळे शासकीय आणि राखीव वनजमिनींच्या व्यवहारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन विभागाने केलेल्या या कारवाईमुळे वनजमिनींवर डोळा ठेवून बेकायदा व्यवहार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai