चिरनेर गावात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

उरण ः चिरनेर गाव परिसरात गेली आठ दिवसांपासून भुरट्या चोरांनी आपली दहशत निर्माण केली आहे. त्यामूळे तेथील रहिवाश्यांमधे भितीचे वातावरण पसरले आहे. भुरट्या चोरांचा बंदोबस्त पोलीस यंत्रणेने लावावा अशी मागणी चिरनेर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत यांना दिलेल्या निवेदनपत्रकाव्दारे करण्यात आली आहे.

चिरनेर ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश फोफेरकर, किशोर भगत यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत यांची गुरुवार दि. 27 जानेवारी रोजी भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून देताना सांगितले की उरण तालुक्यातील चिरनेर हे ऐतिहासिक प्रसिध्द गाव आहे. या गावातील रहिवाशी आनंदात राहत आहेत. परंतु मागील आठ दिवसांपासून अज्ञात, भुरट्या चोरांनी आपली दहशत निर्माण केली आहे. त्यामूळे सध्या गावातील रहिवाशी भिंतीच्या सावटाखाली आपले जीवन जगत आहेत. तरी गावात दहशतीचे वातावरण निर्माण करु पाहणार्‍या अज्ञात, भुरट्या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त पोलीस यंत्रणेने लावावा अशी मागणी याप्रसंगी त्यांनी चिरनेर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली.