शिवबंधन सोडून सुरेखा नरबागे यांची घरवापसी

नवी मुंबई ः काही दिवसांपूर्वी शिवसेनेत गेलेल्या बेलापूरच्या माजी नगरसेविका सुरेखा नरबागे, त्यांचे पती समाजसेवक अशोक नरबागे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह स्वगृही भाजपात प्रवेश केला. आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नरबागे यांचे भाजपात स्वागत करण्यात आले. 

बेलापूर प्रभाग 103 मध्ये सुरेखा आणि अशोक नरबागे यांचे चांगले काम आहे त्यामुळेच सुरेखा नरबागे या प्रभागातून निवडून आल्या होत्या. या दोघांपैकी एक या प्रभागातील उमेदवार असेल, भाजपा कुटुंबात या दोघांचे स्वागत असून त्यांना प्रभागात आवश्यक ती सर्व ताकद दिली जाईल, असे आमदार नाईक यांनी सांगितले.

आ. गणेश नाईक यांचेच नेतृत्व हवे
आम्ही सुरूवातीपासूनच आमदार गणेश नाईक यांच्या सोबतच होतो. प्रभागातील जनतेशी बोललो. सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखालीच काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आम्ही स्वगृही भाजपात परतलो, असे माजी नगरसेविका सुरेखा नरबागे आणि समाजसेवक अशोक नरबागे यांनी सांगितले.