डी.आर.पाटील घराण्यात फूट?

काका विरुद्ध पुतणी सामना रंगण्याची शक्यता

नवी मुंबई ः पालिका निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी पक्षांतर, फोडाफोडी बरोबरच राजकारणातील अभेद्य तटबंदीचे बुरुजही आता ढासळू लागल्याचे चित्र नवी मुंबईत पाहायला मिळत आहेत. तुर्भ्यातील डी.आर.पाटील यांचे घराणेही याला अपवाद नसल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत रंगत असून यावेळी काका विरुद्ध पुतणी अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

गेल्या निवडणुकीत तुर्भ्यातील डी.आर.पाटील घराण्याला चार तिकीटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली होती. यामध्ये शुभांगी पाटील आणि शशिकला पाटील यांनी विजय संपादन केला होता तर निशांत पाटील व विवेक पाटील यांना भाजप जिल्हाप्रमुख रामचंद्र घरत, शिवसेनेचे विलास भोईर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. डी.आर.पाटील यांचे कनिष्ट बंधु चंद्रकांत पाटील यांनी मागच्यावेळी घरामध्ये कोणताही राजकीय वाद निर्माण होऊ नये म्हणून निवडणुक लढवली नाही. राष्ट्रवादी पक्षातून माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पाटील घराण्याने त्यांची सोबत केली.  परंतु यावेळी चंद्रकांत पाटील यांनी निवडणुक लढवण्याची ईच्छा प्रकट केली असून त्यांना आपला प्रभाग देण्यास शुभांगी पाटील किंवा शशिकला पाटील तयार नसल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळत आहे. याबाबत समेट व्हावा म्हणून वरिष्ठ पातळीवरही प्रयत्न सुरु आहेत. 

चंद्रकांत पाटील यांचे माथाडी चळवळीशी जवळचे संबंध असून ते शशिकांत शिंदे यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे डी.आर.पाटील घराण्याने पुन्हा शरद पवारांची साथ द्यावी अशी मनधरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत असून पाटील कुंटुंबियांनी गणेश नाईकांना साथ देण्याचे निश्‍चित केल्याची चर्चा कालपर्यंत होती. परंतु चंद्रकांत पाटील यांनी निवडणुक लढवण्याची ईच्छा जाहीर केल्याने नवा वाद भाजपात उफाळून आला आहे. त्याचबरोबर यावेळी पाटील कुटुंबियांना चार तिकीटे मिळणार नसल्याचेही संकेत पक्षाकडून मिळाल्याने आहे त्या जागाच लढण्याची भुमिका शुभांगी पाटील आणि शशिकला पाटील यांनी घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे. पाटील घराण्याविरोधात ताकदीचे उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून तीन जागांची ऑफर देण्यात आली असून ते कोणता निर्णय घेतात याकडे आता भाजपासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. चंद्रकांत पाटील यांनी वेगळा निर्णय घेतल्यास नवी मुंबईतही काका विरुद्ध पुतणी अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.