पालिकेचा 4825 कोटींचा अर्थसंकल्प

शिक्षण, आरोग्य सेवा व घनकचरा व्यवस्थापनावर भर

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2020-21 चा सुधारित आणि सन 2021-22 चा मूळ अर्थसंकल्प  महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी गुरुवारी मंजूर केला. यावर्षीही पालिकेने कोणतीही करवाढ केलेली नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य सेवा व घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 2339.62 कोटी व रु. 2369.73 कोटी जमा आणि रु. 3081.93 कोटी खर्चाचे  सन 2020-21 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 1627.42 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 4825 कोटी जमा व रु. 4822.30 कोटी खर्चाचे आणि रु.2.70 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2021-22 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचेही अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तसेच अंदाजपत्रक निर्मितीत महत्वाची भूमिका असणारे महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते. 

मालमत्ताकर ः 15 फेब्रुवारी 2021 अखेरपर्यत रु.98.75 कोटी एवढा मालमत्ता कर हा अभय योजनेअंतर्गत वसूल करण्यात आलेला आहे. माहे नोव्हेंबर 2020 अखेर रू. 149.60 कोटी मालमत्ता कराची वसूली करण्यात आलेली आहे व मार्च-2021 अखेर रु. 420.39 कोटी वसूली होईल अशी अपेक्षा आहे. सन 2020-21 या वर्षामध्ये रु. 570 कोटी जमा होईल असा अंदाज आहे. तसेच सन 2021-22 करिता रू. 600 कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. 

 स्थानिक संस्था कर:-  प्रलंबित कर निर्धारणा व प्रलंबित वसूलीव्दारे उत्पन्न, शासनाचे सहाय्यक अनुदान व मुद्रांक शुल्क अनुदान मिळून एकत्रित सुधारित अंदाज एकूण रू. 1226.00 कोटी अपेक्षित असून सन 2021-22 करिता रू.1401.46 कोटी इतका अपेक्षित आहे.

हस्तांतरीत मालमत्ता :- सिडकोकडून विविध नागरी सुविधांचे 554 भूखंड हस्तांतरीत झालेले असून 520 भूखंडांची सिडकोकडे मागणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे एम.आय.डी.सी. कडून महानगरपालिकेस विविध नागरी सुविधांचे 61 भूखंड हस्तांतरीत झालेले असून 233 भूखंडांची मागणी करण्यात आलेली आहे.

पाणीपुरवठा :  सन 2020-21 मध्ये रु.100.43 कोटी जमा होतील अशी अपेक्षा आहे व सन 2021-22 मध्ये अंदाजे वसूली रक्कम रु.122.76 कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

खर्चाच्या बाबी 

उड्डाणपूल : वाहतूक कोंडी टाळून वाहतूक गतीमान होण्यासाठी विविध ठिकाणी नवीन पूल बांधणे या लेखाशीर्षांतर्गत रु. 98.84 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

दिवाबत्ती सुधारणा : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी विद्युत रोषणाई करणे, तसेच जुन्या फिटींग बदलून नवीन एल.ई.डी. फिटींग लावणे इ. कामे प्रस्तावित असून दिवाबत्ती सुधारणा लेखाशीर्षांतर्गत रु. 58.89 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

विद्युत / गॅस दाहिनी उभारणे : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक विभागामध्ये विद्युत / गॅस दाहिनी उभारण्याचे प्रस्तावित आहे. सदर कामाकरीता रु.9.00 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

पर्यावरण-ग्रीन हाऊसिंग कन्सेप्ट, सोलार हिटर, वॉटर रि-सायकलिंग :  राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमांतर्गत छेप ईींंरळपाशपीं लळीूं रलींळेप श्रिरप अंमलबजावणीकरीता सदर लेखाशीर्षांतर्गत रु. 50.00 कोटींची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.

मलनि:स्सारण : मूळ गांवठाणामध्ये उर्वरित ठिकाणी तसेच झोपडपट्टी क्षेत्रात मलनि:स्सारण वाहिनी टाकणे, ट्रिटमेंट प्लान्ट बांधणे आणि तेथील मलनि:स्सारण वाहिनी रस्त्यावरील मुख्य मलनि:स्सारण वाहिनीमध्ये जोडणे याकरीता रु. 50.86 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.

माहिती तंत्रज्ञान / संगणक : ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याद्वारे नागरिकांच्या श्रम, मूल्य व वेळेत बचत होणार आहे. याकरीता अंदाजपत्रकात रु. 127.15 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.

घनकचरा व्यवस्थापन : दैनंदिन साफसफाई, रस्ते सफाई, कचरा संकलन, वाहतूक व इतर अनुषंगिक खर्च या लेखाशीर्षांतर्गत रु.254.20 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. 

आरोग्य सेवा : सर्व वैद्यकीय सोयीसुविधांकरीता सन 2021-22 च्या अंदाजपत्रकात रु.499.41 कोटी एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागाकरीता तरतूद करण्यात आलेली रक्कम एकूण अंदाजपत्रकाच्या 10.35% एवढी असून मागील वर्षीच्या तुलनेत रु.180.00 कोटी रक्कमेने जास्त आहे.

इ.टी.सी.अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र : ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा विभागासाठी सन 2021-22 साठी रु.17.23 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.

क्रीडा व सांस्कृतिक कार्य :  क्रीडा व सांस्कृतिक विभागासाठी सन 2021-22 साठी रु. 106.66 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.

अग्निशमन  : अग्निशमन विभागाकरीता रु..58.50 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.

शिक्षण ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा सक्षम करण्याप्रमाणेच गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचे नियोजन आहे. शिक्षण विभागासाठी सन 2021-22 च्या अंदाजपत्रकात रु.287.72 कोटी एवढी तरतूद केली असून ती एकूण अंदाजित रक्कमेच्या 5.96% इतकी आहे व ती मागील वर्षीपेक्षा रु.33.19 कोटी ने जास्त आहे.

परिवहन : सन 2021-22 चे अर्थसंकल्पात नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी एकूण रू. 150.00 कोटी अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन : महानगरपालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम करण्याच्या दृष्टीने आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणे, आपत्कालीन परिस्थितीत शोध व बचाव पथकासाठी आवश्यक साधनसामुग्री खरेदी करणे, अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण, जनजागृती, आपत्ती धोके निवारण प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे या महत्वाच्या बाबींकरीता तसेच प्रशासकीय व भांडवली खर्च अंदाजपत्रकात रू.21.90 कोटी तरतूद करण्यात आली आहे.

लोकांच्या गरजा व आवश्यकता डोळ्यांसमोर ठेवूनच नवीन कामांचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्वच्छता ही प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकांची दैनंदिन सवय व्हावी मग यातूनच शहराचे आरोग्य सुधारेल असा विश्‍वास आयुक्तांकडून व्यक्त करण्यात आला आहे. आगामी वर्षाचे अंदाज सादर करीत असताना स्वच्छ, सुंदर, प्लास्टिकमुक्त शहराचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहूया व निसर्गातील भूमी, जल, वायू, ऊर्जा, आकाश या पंच तत्वांवर आधारित माझी वसुंधराची जपणूक करुया असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.