खारघर येथे होणार सिक्कीम आणि त्रिपुरा भवन

सिडकोकडून अतिथी गृह उभारणीसाठी भूखंड वाटप

नवी मुंबई ः सिक्कीम आणि त्रिपुरा शासनाने केलेल्या विनंतीनुसार सिडकोकडून खारघर येथील सेक्टर-16 मधील भूखंड क्र. 18 त्रिपुरा सरकारला तर भूखंड क्र. 19 आणि 20 सिक्कीम सरकारला अतिथी गृह/विक्रयालयाच्या (स्टेट गेस्ट हाउस/एम्पोरियम) उभारणीसाठी वाटपित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर भूखंड क्र. 18 चे क्षेत्रफळ 1970.36 चौ.मी. इतके आहे, तर भूखंड क्र. 19 आणि 20 या भूखंडांचे एकत्रित क्षेत्रफळ 4000 चौ.मी. इतके आहे.  

सिडकोतर्फे 1992 मध्ये वाशी येथील सेक्टर-30 मधील भूखंड विविध राज्यांच्या सरकारांना त्यांच्या राज्य अतिथीगृह/विक्रयालयाच्या उभारणीसाठी वाटपित करण्याकरिता धोरण तयार करण्यात आले होते. सिडकोतर्फे आतापर्यंत आसाम, गुजरात, मणिपूर, कर्नाटक, राजस्थान, पंजाब, मिझोराम, मेघालय, नागालँड इ. राज्यांना भूखंड वाटपित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, सिक्किम आणि त्रिपुरा सरकारांकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार सेक्टर-16, खारघरमधील भूखंड क्र. 19 आणि 20 आणि भूखंड क्र. 18 अनुक्रमे सिक्किम आणि त्रिपुरा सरकारच्या राज्य अतिथीगृह/विक्रयालयाच्या उभारणीसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.  

सदर भूखंडांचे वाटप हे नवी मुंबई भूमी विनियोग (सुधारित) अधिनियम, 2008 मधील तरतुदींनुसार 60 वर्षांच्या भाडेपट्ट्याने करण्यात येणार असून या भूखंडांकरिता 1 इतका चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय राहणार आहे. संबंधित भूखंडांकरिता सिक्किम सरकारला रु. 9,93,08,000 तर त्रिपुरा सरकारला रु. 4,89,18,127.72 भाडेपट्टा अधिमूल्य देय असणार असून किरकोळ शुल्क, जीएसटी आणि अन्य संबंधित शुल्क हे स्वतंत्ररीत्या भरावे लागणार आहेत.    

सिडकोकडून अन्य राज्यांच्या सरकारांना भूखंड वाटपित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, त्रिपुरा आणि सिक्किम सरकारलाही राज्य अतिथी गृहाच्या उभारणीसाठी भूखंड वाटपित करण्यात येणार आहेत. यामुळे संबंधित राज्यांना नवी मुंबईमध्येही त्यांच्या संस्कृतीचे जतन करता येईल; तसेच सदर अतिथीगृहे ही या राज्यांचे प्रतिनिधीत्व करणारी ठरतील.
-डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको