Breaking News
भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक साधू कार्यरत असून काही जण जीवन जगण्याची कला समाजाला समजावण्यात व्यस्त आहेत, काही जण संभोगातून समाधी कशी साधावी या आशेत आहेत, काही अवधूतबाबा विज्ञानाच्या पलीकडील विज्ञानाच्या शोधात आहेत, तर काही जण साधकांना ध्यान आणि साधनेच्या माध्यमातून सद्गुरू बनवण्याच्या मार्गावर आहेत. काही बाबा, योगगुरू यांनी संस्थाने उभारून धर्माचे अवडंबर समाजात माजवून त्यावर आपली आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक उन्नती करण्यात स्वतःला आकंठ बुडवून घेतले आहे. या उलट सत्यनारायण गोयंका सारखे स्थीतप्रज्ञ विपश्यनेच्या मार्गावरून जीवनात शील व प्रज्ञा अंगीकारून खर्या धर्माची ओळख समाजाला करून देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे या सर्वांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी अंतिम ध्येय एकच असेल असे मानने चुकीचे ठरू नये.
सध्या देशात रामराज्य अवतरल्याने स्वदेशी चळवळीला अच्छेदिन आले आहेत असे समजायला हरकत नाही. भाजप सरकारच्या काळात योगबाबा म्हणून जास्त रामलीला करायला संधी मिळाली ती रामदेव बाबांना. रामलीला आणि रामदेवबाबा यांचा तसा घनिष्ट संबंध आहे. काँग्रेस सरकारच्या काळात रामदेवबाबाने योग शिकवण्याच्या नावाखाली शारीरिक सौष्ठवाबरोबर जनतेच्या बौद्धिकाचे क्लास घेतले त्यावरून ‘हर दर्द का एकही इलाज रामदेवबाबा’ अशी त्यांची प्रतिमा देशात झाली. या प्रतिमेच्या आडून त्यांनी सुरु केलेली भ्रष्टाचार, काळापैसा विरुद्धच्या लढाईने देशांत सत्तांतर घडवून आणण्यास महत्वाची भूमिका बजावली. यावरून त्यांच्या रामलीलांची कल्पना येते. या प्रतिमेच्या मागे कोणाची प्रतिभा होती ते मात्र कळायला देशातील राजकर्त्यांना उशिरच झाला. पण त्याची काय किंमत देशाला मोजावी लागणार हे मात्र येणार काळच ठरवेल.
योग हि जगाला भारताने दिलेली अमूल्य भेट आहे. 2010 साला पासून बाबा रामदेव आणि त्याचा बाशीर्द आचार्य बाळकृष्ण यांनी योगाच्या माध्यमातून सुदृढ समाजनिर्मितीचा प्रयोग देशात सुरु केला. खरंतर यात वावगे असे काहीच नाही. त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक योगाचार्याचे कर्तव्यच आहे. सकाळी पाच वाजल्या पासून 7.30 वाजेपर्यंत रामदेवबाबांची योगलीला वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर सुरु असे. नंतर जसजशी बाबाना लोकमान्यता मिळून धनमान्यता मिळाली तसे बाबानी स्वतःचे आस्था चॅनेल सुरु केले. मोठ्या आस्तेने हजारो लोग दररोज सकाळी आस्था चॅनेल समोर बसून योग शिकू लागले. योगामुळे आजारी माणसे कशी बरी होतात याचे प्रात्यक्षिकच डोळ्यासमोर लोकांना बाबानी दाखवल्याने अल्पावधीत योगबाबांना संतत्व प्राप्त झाले. हजारोंचा जनसमुदाय एका हाकेसरशी जमू लागल्यावर बाबांनी योगाबरोबर स्वदेशीचा पुरस्कार आपल्या व्यासपीठांवरून सुरु केला. भारतीय समाजाने हजारो वर्ष मानसिक, वैचारिक गुलामगिरीत काढल्याने स्वदेशी, देशभक्तीच्या नावाखाली काहीही भरवले तर तो त्याला अमृत मनून प्राशन करतो, याची जाणीव असल्याने बाहेरच्या कंपन्या कशा देशाची लूट करत आहेत याचे भारूड गायला रामदेवांनी सुरु केले. या भारुडाचा म्हणावा तसा परिणाम साधल्यावर आपल्या पोतडीत एकेक वस्तू काढायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी अनेक आजारांवरील निरनिराळे काढे, आयुर्वेदिक गोळ्या, भस्म यांची निर्मिती पतंजलीच्या नावाने करून आपल्या व्यासपीठावरून याचा पुरस्कार केला. अल्पावधीतच त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली कि लोकांकडून लाखोंच्या अनामत रकमा घेऊन त्यांना पतंजलीच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी दुकाने टाकण्यास मोकळीक दिली. हरिद्वार येथे शेकडो एकर जमीन घेऊन तेथे पतंजली ऋषीच्या नावाने मोठा आश्रम सुरु केले. आज हजारो लोक लाखो रुपये खर्चून तेथे उपचाराला जात आहेत.
लोकांचा वाढत असलेला विश्वास पाहून रामदेवबाबांनी मग आपला कारभार औषधांपुरता मर्यादित न ठेवता स्वदेशीच्या नावाखाली निरनिराळी उत्पादने आपल्या पतंजली बॅनर खाली विकण्यास सुरुवात केली. मधापासून बीस्किटांपर्यंत, निरनिराळ्या धान्यांपासून पीठापर्यंत, शिवाय अनेक खाद्यतेल, साबण, सरबते, अगरबत्त्यासह अनेक वस्तू त्यांच्या दुकानात विक्रीसाठी दिसू लागल्या. हिंदुस्तानात गाईप्रती असलेली आस्था व तिच्यापासून बनणार्या वस्तुंना असणारी मागणी पाहून शुद्ध गाईचे तूप विकणारे एकमेव विश्वसनीय नाव म्हणजे पतंजली अशी ख्याती अल्पावधीतच झाली. काहीच दिवसात शेकडोंच्या घरात असलेली पतंजलीची उलाढाल हजारो कोटींच्या घरात गेली. खरंतर त्याचे स्वागतच आहे कारण रामदेव बाबानी स्वदेशीचा पुरस्कार करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला थोड्याफार प्रमाणात का होईना चालना दिली. परंतु आता पतंजली विकत असलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. मध, तूप आणि टूथपेस्टच्या दर्जाबद्दल लोक साशंक आहेत. सरकारच्या पाठिंब्यावर आपल्या कोणत्याही लीला लोक सहन करतील या भ्रमात रामदेवबाबा असल्याने त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित.
योगाच्या माध्यमातून जनमानसात विश्वास संपादन केल्यानंतर काळ्या धनाविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली. देशातील राजकर्त्यांनी, अधिकार्यांनी व उद्योगकांनी देशात पैशाची लूट करून परदेशात ठेवलेल्या कथित लाखो कोटीच्या काळ्या धनाबाबत सकाळ संध्याकाळ प्रवचन देण्यास सुरुवात केली. लाखो कोटींच्या काळ्या धनाचे आकडे त्यांनी कोठून आणले हे तेव्हाही अनुत्तरित होते आणि आजही आहे. सकाळी योग शिकवताना ते 50 पानांचे बाड घेऊन बसत आणि काळ्याधनाबाबत राजकर्त्यांना शिव्यांची लाखोंली वाहत टाळ्या मिळवत. परदेशातील काळे धन परत येऊन आपला देश सुजलाम सुफलाम होईल या आशेने मग लोकांनी रामदेवबाबाना पाठिंबा देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी देशात तथाकथित 2जी घोटाळा, दिल्लीतील खेळ घोटाळा, आणि कोळसा घोटाळ्याचे माध्यमांनी केलेल्या वार्तांकनाने या भ्रष्टाचारामुळेच देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली असा समज लोकांचा करुन देण्यास रामदेव बाबा व विरोधी पक्षांना यश आले. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढते कच्चा तेलाचे दर, रुपयाचे होणारे अवमूल्यन याबाबत जाणीवपूर्वक कानाडोळा करून सरकारला बदनाम करून टाकले. रामदेवरावांनी अनेक टीव्हीवरील कार्यक्रमात भाजप सत्तेत आले तर पेट्रोल काय दराने मिळेल याचे भाव देखील लगोलग जाहीर केले. बाबांच्या आकड्यांना भुलुनच मोदींनी काळे धन परत आले तर प्रत्येकाच्या खात्यात किती रुपये जाऊ शकतात याचा हिशोब आपल्या भाषणातून दिला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. या देशव्यापी लढ्याचे नेतृत्व सुरुवातीला रामदेवबाबांनी केले. रामलीला मैदानावर आपल्या भक्तांची मोठी जत्रा भरवून कॉग्रेस सरकारवर दबाव टाकला, पण बाबांना जोखल्यावर काँग्रेसवाल्यांनी त्यांची अशी काही तुला केली कि या बाबाला स्त्रीवेषात लीला बनून परागंदा व्हावे लागले. पण तोपर्यंत व्हायचे तेव्हढे नुकसान त्यांनी सरकारचे केले होते.
देशातील सत्तांतर हे रामदेव महाराज आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. देशातील तथाकथीत घोटाळे, वाढती महागाई याला तत्कालीन सरकारच्या धोरणांना जबाबदार ठरवत भाजपचे सरकार कसे आवश्यक आहे हे समाजावर बिंबवण्यास ते यशस्वी झाले. त्याचे फळ म्हणून अनेक ठिकाणी फूडपार्कच्या नावाखाली शेकडो एकर शासकीय जमीन पतंजलीला देण्यात आली. रुची सोया हि बुडीत कंपनी त्यांनी विकत घेऊन अल्पावधीत त्यांचे शेअर गगनाला भिडवले. त्याचबरोबर ‘आपदा में अवसर’ या मोदींच्या हाकेला प्रतिसाद देऊन कोरोनासाठी फक्त 45 जणांवर उपचार करून मिळवलेली ‘कोरोनील’ला मंजुरी अशा अनेक पद्धतीने मोदी सरकार बाबांच्या उपकारांची परत फेड करत आहे. देशात सध्या महागाई गगनाला भिडत आहे, 45 वर्षातील सर्वात ज्यास्त बेरोजगारी सध्या देशात आहे. मोदीसरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे भाव रोज कीर्तिमान स्थापन करत असताना महागाई आणि वाढत्या पेट्रोल दरवाढीवरून प्रवचन देणार्या रामदेव बाबांची आठवण आता लोकांना येत आहे. रामलीला मैदानात कथित काळ्या धनाबाबत त्यांनी आंदोलन केले त्याबाबत गेल्या सहा वर्षात चकार शब्द उच्चारला नाही हे सर्व अनाकलनीय आहे. देशातील वाढत्या महागाई वरून लोकांनी त्यांना प्रश्न विचारल्यावर लोकांनी आता गाड्यांचा वापर न करता सायकलकडे वळावे आणि महागाई वाढली तर घट्ट डाळ खाण्याऐवजी पातळ डाळ खावी असा अनाहूत सल्ला देत आहेत. त्यामुळे रामलीला मैदानावर आंदोलन करणारा हाच काय तो बाबा? असा प्रश्न पडला आहे. जर सरकारला जाब विचारल्यास ईडी, सीबीआयचे भूत मागे लागून आपल्या रामलीला उघड्या पडतील या चिंतेने रामदेवबाबा कपालभाती किंवा अनुलोम विलोम करण्यात मग्न असावेत. ‘जीवन जगण्याची कला’ शिकवणारे, मोदींच्या काळात कोणत्या पद्धतीने जीवन जगावे याचा शोध घेण्यात कदाचित ध्यानस्त असावेत. त्यामुळे समाजाला ठकवणार्या बहुरूपी आणि बहुढंगी योगबाबांच्या रामलीलांना वेसण घालण्याची वेळ समाजावरच आली आहे....
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे