Breaking News
मराठी सिनेसृष्ठीत दाखल झालेली अभिनेत्री शाल्वी शहा हिचा आगामी सिनेमा ‘लॉ ऑफ लव्ह’ आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत केलेली ही बातचीत.
शाल्वी तुझं सिनेक्षेत्रातील आगमन आणि पहिल्या सिनेमापर्यंतचा प्रवास कसा होता?
अभिनयाच्या आवडीसोबत हे क्षेत्र मी करियर करण्याच्या दृष्टिकोनातून निवडलं. त्यात आपला ठसा उमटवायचा हे माझं ध्येय आहे. कोणताही अपघात किंवा सहज केलेला प्रयोग म्हणून त्याकडे पाहिलं नाही. पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. बिगिनर्स असल्यामुळे अनेक लहान मोठ्या भूमिका केल्या. त्यानंतर ‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमाची संधी मिळाली.
तुझी प्रमुख भूमिका असलेला सिनेमा येतोय त्याबद्दल काय सांगशील?
‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमाच्या निमित्ताने एक मोठी संधी मला मिळाली आहे त्याचं मी शंभर टक्के सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकही आमच्या प्रयत्नाला मनापासून दाद देतील असा मला विश्वास आहे. रोमँटिक सिनेमा नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय राहिला आहे. या सिनेमातील साक्षी आणि आदित्यचं प्रेमही तितकंच अनोखं आहे. मराठी सिनेमे नेहमीच आपल्या विचारांना नवी दिशा देणारे ठरतात. एकाग्र विचार करायला लावणारी कथा दर्दी प्रेक्षकांना भुरळ घालते त्यामुळे मराठी चित्रपटांच्या बाबतीत असलेली उत्सुकता आपण सगळेच पहातो. हा सिनेमा निव्वळ प्रेम कथा नाहीतर तावून सुलाखून निघालेलं प्रेमवीरांचं प्रेम आहे. आजकाल वेळेनुसार आणि परिस्थिती नुसार बदललेल्या प्रेमाला आरसा दाखवणारा हा सिनेमा आहे.
चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या कारकिर्दीबद्दल काय वाटतं ?
माझ्या मते प्रत्येक क्षेत्रात नाव कमविण्यासाठी किंवा स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी मेहनत आणि स्वतःतील वेगळेपणा सिद्ध करावा लागतो त्यात दुमत नाही. मात्र अनपेक्षित अशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामापेक्षा मोठ्या शहरातील काम करण्याची ठिकाणं ही भीतीदायक वाटतात. कामाच्या ठिकाणी असलेली असुरक्षितता कमी झाली तर महिलांच्या प्रगतीतील मोठा अडथळा दूर होईल. अभिनेत्री या नात्याने शुटिंगचे लोकेशन नक्कीच सगळ्याबाबतील सुरक्षित असायला हवे.
जागतिक महिला दिनानिमित्त तुझं वैयक्तिक मत काय आहे?
वाचताना बर्याच जणांना काहीसं बोझड वाटेल कि निसर्गानेच महिला आणि पुरुष यांना एकसारखं बनवलं नाही तर काही बाबतीत विभिन्नता ही असणारच. महिलांच्या ठायी असलेली स्वीकृती किंवा कोणतीही गोष्ट सहज स्वीकारणं हा उत्तम गुणधर्म आहे. परिस्थिती म्हणा, रीती परंपरा, माणसं सहजपणे आपण आपलीशी करतो त्यामुळे बर्याच गोष्टी सोप्या होतात. परंतू परिस्थिती स्वीकारत असताना ते स्वीकारण्याची आपली मर्यादा आहे याचंही भान आपण महिलांनी ठेवला पहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर स्वीकारणं म्हणजे सोशिकपणा नव्हे हेच आधी लक्षात घेऊयात.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai