पालिका रुग्णालयात 11 मार्चपासून 24 तास लसीकरण

नवी मुंबई ः नवी मुंबईत कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून 8 मार्चपर्यंत 33069 व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. आता पालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या रुग्णालयांत 11 मार्चपासून 24 तास लसीकरण केंद्र सुरु राहणार आहे. यामुळे नवी मुंबईकरांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार लस घेता येणार आहे. 

महानगरपालिका कार्यक्षेत्रात 8 मार्चपर्यंत 33069 व्यक्तींना कोव्हीड 19 लसीकरण करण्यात आले असून यामध्ये डॉक्टरांसह इतर आरोग्यकर्मी, पोलीस सुरक्षा स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच तिसर्‍या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्तींचा समावेश आहे. शासन निर्देशानुसार सद्यस्थितीत वाशी, नेरूळ व ऐरोली या 3 महानगरपालिका रूग्णालयांत व 11 खाजगी रूग्णालयांमध्ये आठवड्यातील सहा दिवस तसेच महानगरपालिकेच्या 4 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोमवार, बुधवार व शुक्रवार असे आठवड्यातील 3 दिवस लसीकरण करण्यात येत आहे. उद्यापासून लसीकरणासाठी प्राथमिक नागरिक आरोग्य केंद्र संख्येत आणखी वाढ होत असून सीबीडी, करावे, कुकशेत, शिरवणे, जुहूगांव, घणसोली, ऐरोली, दिघा व इलठणपाडा अशा 9 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. म्हणजेच उद्यापासून लसीकरणासाठी एकूण 27 लसीकरण केंद्रे कार्यान्वित असणार आहेत व शुक्रवारपर्यंत त्यात आणखी वाढ करीत 32 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात येत आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर व्यवस्थितरित्या लसीकरण सुरू असून केंद्रांमध्ये वाढ करावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. याबाबत शासन स्तरावर लसीकरण केंद्र वाढीबाबत पाठपुरावा केला जात आहे. या अनुषंगाने कोव्हीड 19 लसीकरण कामाला अधिक गती मिळावी व जास्तीत जास्त लाभार्थी नागरिकांना त्यांच्या सोयीच्या वेळी लस घेता यावी याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली या तिन्ही सार्वजनिक रूग्णालयांतील लसीकरण केंद्रे 24 तास कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याव्दारे ज्या लाभार्थी नागरिकांना कामाच्या वेळेमुळे अथवा इतर काही कारणांमुळे सकाळी 9 ते सायं. 5 या लसीकरण केंद्रांच्या वेळेत लस घेणे शक्य होत नाही त्यांची सोय होणार आहे. गुरूवार, दि.11 मार्च 2021 रोजी महाशिवरात्रीची सार्वजनिक सुट्टी असूनही लसीकरण सुरू राहणार असून त्याच दिवसापासून महानगरपालिकेच्या तिन्ही सार्वजनिक रूग्णालयांतील लसीकरण केंद्रे दिवसरात्र सुरू राहणार आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.