अन्यथा सिडकोची सर्व कामे बंद पाडू

कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडको अधिकार्‍यांना धरले धारेवर 

उरण ः न्हावा-शिवडी सिलिंग प्रकल्प, नेरुळ-उरण रेल्वे आदी प्रकल्पांसाठी सिडकोने शेतकर्‍यांच्या जमीनी संपादन केल्या. हे प्रकल्प अंतिम टप्प्यात आले आहेत मात्र अद्याप प्रकल्पग्रस्तांना त्यांचा योग्य मोबदला दिला नाही. याचा जाब विचारण्यासाठी कामगार नेते महेंद्र घरत यांनी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व सिडको अधिकार्‍यांची बैठक घेतली. यामध्ये प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत अन्यथा सिडकोची सर्व कामे आम्ही बंद पाडून सिडको विरोधात आंदोलन उभारावे लागेल असा सज्जड इशारा देऊन सिडको अधिकार्‍यांना धारेवर धरले. 

पनवेल तालुक्यातील न्हावा-शिवडी सिलिंग प्रकल्प, MTHL, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प, NH 4, आदी  प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आली असुन सिडकोने प्रकल्पग्रस्तांना अद्याप 22.5% दिले नाहीत, स्थानिक क्रशर-कॉरी मालक आहेत त्यांना आपला व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा दिली नाही, ज्या शेतकर्‍यांची गोडावून, घरे तोडली त्यांना अद्याप प्लॉट दिले नाहीत. परंतु बाहेरील परप्रांतीय लोकांना व्यवसायकांना मात्र ताबडतोब भूखंड दिले गेलेत या बद्दल प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांमध्ये सिडको विरोधात प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे गव्हाण येथील 7 घरांचा प्रश्न आहे तो सुद्धा तातडीने सोडवावा व सिडकोच्या उलवे नोड मधील हौसिंग प्रकल्पामध्ये त्यांना प्लॉट देण्यात यावे. अशा अनेक प्रलंबित मागण्यासाठी सिडकोच्या बेलापूर येथील ऑफिसमध्ये कामगार नेते आणि प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व सिडको अधिकारी यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत अन्यथा सिडकोची सर्व कामे आम्ही बंद पाडून सिडको विरोधात आम्हाला आंदोलन उभारावे लागेल असा इशारा बैठकीत दिला. यावर सिडको अधिकारी यांनी आम्ही माहिती घेऊन प्रलंबित राहिलेले प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे वचन कामगार नेते महेंद्रशेठ घरत आणि प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना दिले. 

या वेळी या बैठकीला राष्ट्रीय इंटक चे सचिव कामगार नेत महेंद्रशेठ घरत, अतुल पाटील,सुरेश पाटील इंटक चे उरण तालुका अध्यक्ष संजय ठाकूर, बाळाशेठ पाटील, नरेश घरत, यशवंत घरत,धर्माशेठ पाटील, सुरेश ठाकूर, धर्मदास घरत,दिपक पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.