रविवारी धावणार ‘नवी मुंबई दर्शन’ बस

पर्यटकांना होणार फायदा ; खा. विचारे यांच्या मागणीला आयुक्तांचा हिरवा कंदिल

नवी मुंबई ः खाडी किनारा लाभलेल्या नवी मुंबईकडे येथील पर्यटन स्थळांमुळे अनेक पर्यटक आकर्षित होतात. या पर्यटकांचा प्रवास सुखकर व कमी खर्चात व्हावा यासाठी तसेच  पर्यटकांसाठी नवीमुंबई दर्शन’ बस सेवा सुरु करण्याची मागणी खा. राजन विचारे यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. याची दखल घेऊन रविवारच्या सुट्टीसाठी बस सेवा सुरु करण्यासाठी लवकरच परिवहन उपक्रमाद्वारे पाहणी व नियोजन करून बस सेवा लवकरच सुरु केली जाईल असे विचारे यांना कळविले आहे.

नवी मुंबई शहराचा विकास झपाट्याने होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, रो-रो सेवा अशी एक ना अनेक विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. येथील खाडी किनार्‍यामुळे ऐरोली येथील बायो डायव्हर्सिटी पार्कही विकसित होत आहे. याच पार्श्वभूमीवर विदेशी पक्षी या पार्कमध्ये नेहमीच स्थलांतरित करत असतात. त्यांच्या स्थलांतरामुळे येथील निसर्ग सौंदर्याला नवी उभारी मिळते. त्यामुळे येथील नयनरम्य पर्यटन स्थळाचा लाभ घेण्यासाठी पर्यटक नेहमीच आकर्षित होतात. परंतु, पर्यटकांना येथील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी खाजगी वाहनांच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. परिणामी प्रवासाठी त्यांना जादाचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे.पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी खासदार राजन विचारे यांनी नुकतेच नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पत्राद्वारे नवी मुंबई येथील पर्यटन स्थळांना उत्तम दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मुंबईच्या धरतीवर जशी रविवारी बस चालविली जाते त्याप्रमाणे ‘नवीमुंबई दर्शन’ बस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती.

या मागणीची नवी मुंबई महापालिकेने तातडीने दखल घेत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘मुंबईदर्शन’ डबलडेकर बस सेवेप्रमाणेच ‘नवीमुंबई दर्शना’ साठी आठवड्यातील रविवारच्या सुट्टीसाठी बस सेवा सुरु करण्यासाठी लवकरच परिवहन उपक्रमाद्वारे पाहणी व नियोजन करून बस सेवा लवकरच सुरु केली जाईल असे कळविले आहे.

पर्यटकांना होईल लाभ 
नवी मुंबई शहरात विविध दर्जेदार पर्यटन स्थळे आहेत. घणसोली येथील गवळीदेव सुलाईदेवी, बेलापुर किल्ला या पर्यटन स्थळांचा विकास वेगाने होत आहे. त्याच बरोबर नवी मुंबई महापालिकेकडून महापालिका क्षेत्रात तब्बल 350 अद्ययावत उद्यान विकसित केले आहेत. तसेच येथील नव्याने होऊ घातलेल्या ज्वेलपार्कचे काम सुरु आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ता असलेल्या पामबीचला लागून 16 किमी लांबीचा सायकल ट्रॅकही याठिकाणी उभारण्यात येणार आहे. या सर्व विकासकामांचा नवी मुंबई महानगरपालिकेने आढावा घेत नवी मुंबई शहरात विविध सार्वजनिक सेवांचे पर्यटकांना आकर्षण व्हावे, यासाठी लवकरच हि बस सेवा सुरु केल्यास पर्यटकांना याचा लाभ मिळणार आहे व महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे असे खा. विचारे यांनी सांगितले.